सातारा : फुलांचं ‘कास’ भारी… धरणाचं पाणीही ‘लय भारी’

सातारा : फुलांचं ‘कास’ भारी… धरणाचं पाणीही ‘लय भारी’
Published on
Updated on

सातारा :  सातारा पालिकेने कास धरणातून होणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या प्रयोगशाळेत केल्या आहेत. कास धरणातील पाणी मानकांच्याद़ृष्टीने योग्य असल्याचे अहवाल भूजल सर्वेक्षण प्रयोगशाळेने दिले आहेत. कास धरणातील पाण्यात खनिजांचे योग्य प्रमाण असून अल्काईन तसेच पाण्याचा पीएच नैसर्गिकरित्या राखला जात असल्याने फुलांचं कास भारी तसंच धरणाचं पाणीही 'लय भारी' असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

कासचे अल्काईन पाणी आरोग्यास उत्तम

मानवी आरोग्यासाठी खनिजांनी समृध्द असलेले पाणी स्वच्छ व पिण्यासाठी चांगल असते. फ्लोरिन, कॅल्शियम यासारखी खनिजे पाण्यात योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. कास धरण पाणलोट क्षेत्रात मानवी हस्तक्षेप नसल्याने अजिबात प्रदूषण होत नाही. याऊलट डोंगर खोर्‍यातून झर्‍यांद्वारे धरणात येणार्‍या पाण्यात मातीतून अनेक खनिजे मिसळतात. ती मानवी आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. कास धरणाचे पाणी नैसर्गिकरित्या अल्काईन आहेत. अल्काईन पाणी आरोग्यासाठी गरजेचे असते. हाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी असे पाणी महत्वाचे मानले जाते. अशा पाण्यामुळे अ‍ॅसिडीटी होत नाही. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. रक्ताभिसर होण्यास मदत होते.

पाणीपुरवठा विभागाकडून 125 कि.मी.हून अधिक पाणी वितरण व्यवस्थेचे जाळे

सातारा पालिकेकडून शहरास कास धरणातून कास उद्भव योजना व उरमोडी नदीवरील शहापूर उद्भव योजनेतून पाणीपुरवठा जातो. पाणीपुरवठा विभागाकडून 125 कि.मी.हून अधिक पाणीवितरण व्यवस्थेचं जाळं उभारण्यात आले. त्यावरुन हजारो नळ कनेक्शन्स देण्यात आली आहेत. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्याद़ृष्टीने प्रयत्न केले जातात. मात्र काहीवेळा अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होतात. यावेळी पाणीपुरवठा विभागाकडून मंगळवार पेठ, धस कॉलनी, रामाचा गोट तसेच शहराच्या पश्चिम भागातील ठिकठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.

कास धरणातून कुठे कुठे होतो पाणी पुरवठा?

 कास धरणातून सातार्‍यातील मंगळवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, रामाचा गोट, शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, यादोगोपाळ पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, माची पेठ या परिसरास पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ठिकठिकाणी पाणीवितरण टाक्या उभारण्यात आल्या आहेत.

कास धरण पाणी योजनेविषयी थोडसं

  • पाटबंधारे खात्याकडून इ.स. 1881 साली उरमोडी नदीवर कास गावाजवळ समुद्रसपाटीपासून 1120 मीटर उंचीवर 15 मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले. या धरणाची लांबी 210 मीटर व रुंदी 90 मीटर इतकी होती. 1122 मीटर इतकी पाणीसाठवण क्षमता होती.
  • धरणाजवळ व्हॉल्व्ह टॉवर बसवून पाटातून व खापरी पाईपमधून पाणी आणण्यात आले. आवश्यक ठिकाणी 225 मोर्‍या बांधण्यात आल्या. तीन ठिकाणी सायफन होते. 1935 साली कास पाणीपुरवठा कामात सुधारणा करण्यात आली. कास बंधारा व सांडवा दुरुस्ती, सांडव्यावर फळ्या बसवणे, कासानी फॉल येथे सिमेंट पाईप बसवणे, तीन निवळण टाक्या, पाट दुरुस्ती आदि कामे करण्यात आली. कोयनेच्या भूकंपानंतर कास, पेट्री भागात डोंगराच्या एका भागाला भेग पडून तो डोंगरपासून वेगळा झाला. त्यामुळे सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत असते. यावर उपाय म्हणून 1977 साली सुधारित कास योजना राबवण्यात आली.
  •  सातारा शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्या वाढली. पाण्याची मागणी वाढत असल्याने इतरही पाणी योजना आखण्यात आल्या. दहा वर्षांपूर्वी सातार्यात वाढीव पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. त्याचबरोबर कासमधून येणारा उघडा पाट बंदिस्त करण्यात आला. धरणाची उंची वाढवण्यात आली. धरणात सध्या 0.5 टीएमसी इतका साठा झाला असून जलवाहिन्यांची कामे सुरू आहेत.

काय आहे या पाण्याची नजाकत

1 घरच्या घरी तपासता येते पाण्याची गुणवत्ता

घरी नळाच्या पाण्याने भरलेला काचेचा ग्लास दोन-तीन तास स्थिर ठेवावा. ग्लासच्या तळाशी गाळ असल्यास पाण्याने शुद्धतेची मानके ओलांडल्याचे स्पष्ट होते. पाण्याला ब्लीच पावडरचा वास व कडवट चव येत असेल तर क्लोरीननेही मानकाचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी मानके विकसित होत असून त्यामध्ये सुधारणा होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची मानके तयार करताना ती अनेक घटकांशी संबंधित असतात.

2 कासचे पाणी देशातही अव्वल

दहा वर्षांपूर्वी एका संस्थेने संपूर्ण देशातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा अभ्यास केला होता. त्यावेळी कास धरणातील पाण्याने शुद्धतेचे सर्व निकष पूर्ण करत देशात टॉप फाईव्हमध्ये क्रमांक मिळवला होता. कास धरणाच्या शुद्धतेची महती त्यानंतर चर्चेला आली. कास परिसरात पर्यटन वाढत असून प्रदूषणापासून धरणातील पाण्याची शुद्धता कायम टिकवण्यासाठी सातारकरांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

3 उन्हाळ्यात पाण्याचा रंग का बदलतो?

कास धरणातून सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राकडे येणारे पाणी काही ठिकाणी उघड्या पाटाने येते. आता हा पाट बंदिस्त करण्यात येत आहे. पण पाटातून येणारे पाणी खडकातून वाहताना त्यातील लोह पाण्यात मिसळते. हे पाणी विशेषत: उन्हाळ्यात सूर्यकिरणांमुळे तापत असताना जलशुद्धीकरण केंद्रात ब्लिच पावडर व लोह यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्यास लाल रंग येते. त्याचे कणही पाण्यात दिसतात. मात्र असे पाणी पिणे आरोग्यास हानिकारक नसते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

कासच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण कमी

कास धरणाच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण खूप कमी आढळले आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत नाही. याऊलट पाणीपुरवठा करणार्या इतर पाणीस्रोतांमधील क्षारांचे प्रमाण प्रचंड असून जलशुद्धीकरणावेळी प्रक्रिया करून क्षाराचे प्रमाण कमी करावे लागते. पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असेल तर मुतखडा यासारख्या विकारांना सामोरे जावे लागते. पाण्याची गुणवत्ता ही बर्‍याच घटकांवर अवलंबून असते. पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्र, पाणी वितरण व्यवस्था पाण्याच्या शुद्धतेच्याद़ृष्टीने महत्त्वाचे घटक आहेत.
त्याद़ृष्टीने सातारा पालिका प्रयत्न करत आहे.

कासचे पाणी खनिजांनी समृद्ध

  •  कास धरण पाणलोट क्षेत्रातील मातीमध्ये मॅग्नेशियम तसेच कॅल्शियमचे प्रमाण असल्यामुळे नैसर्गिकरित्या दोन्ही घटक पाण्यातून मिळत असल्याने हे पाणी शरीरासाठी उपयुक्त आहे. हे घटक असणारे पाणी अल्काईन समजले जाते. असे अल्काईन पाणी 110 रुपये लिटरने विकले जाते. खेळाडू तसेच विमानातील प्रवाशांना असे पाणी पिण्यासाठी दिले जाते.
  •  कास धरणातील पाणी डोंगर खोर्‍यातून वाहत येत असल्यामुळे त्यामध्ये मिनरल्सचे प्रमाणही आढळते. त्यामुळे या पाण्याचा 'पीएच' वाढण्यास मदत होते. याउलट औद्योगिकीकरण व मानवी हस्तक्षेप असलेल्या परिसरातील पाण्याचा 'पीएच' खूप कमी असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news