पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार सलमान खानचा डुप्लिकेट म्हणजेच बॉडी डबलची भूमिका साकारणाऱ्या सागरचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. तो प्रतापगढचा रहिवासी होता. शुक्रवारी दुपारी मुंबईमध्ये जिममध्ये असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याचा मृतदेह मुंबईहून त्याच्या घरी नेण्यात येणार आहे. (Salman Khan Duplicate Death)
तापगढ जनपदमध्ये अंतू भागातील पांडेय का पुरवा येथे सागरचा जन्म झाला होता. चित्रपट कलाकार सागरचे पूर्ण नाव राजेंद्र प्रसाद उर्फ गुड्डू होतं. शुक्रवारी दुपारी मुंबईमध्ये अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. सलमान खानचा डबल रोल साकारणाऱ्या सागरने बाडीगार्ड चित्रपटामध्येही सलमानचा डुप्लिकेट म्हणून भूमिका साकारली होती. सागरला सागर सलमान पांडेय नावानेही ओळखलं जात होतं.
सागर जिममध्ये वर्कआऊट करत होता. तेव्हा अचानक तो कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. सागरने ब्लॉक बस्टर चित्रपट कुछ-कुछ होता है मध्येही सलमान खानच्या डुप्लिकेटची भूमिका साकारली होती. यानंतर बजरंगी भाईजान, ट्यूबलाईट, दबंग, दबंग-२, दबंग-३ यासारख्या चित्रपटांमध्ये सलमानसोबत काम केलं होतं.