पुसेसावळी; पुढारी वृत्तसेवा : समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह मेसेजवरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटांत झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली असून चौघांना ताब्यात घेतले आहे. नूरहसन लियाकत शिकलगार (वय ३२) असे ठार झालेल्याचे नाव आहे. संपूर्ण पुसेसावळी गावात कर्फ्यू लावण्यात आला आहे. जिल्ह्यातही १३ तारखेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. घटनेचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटत असून सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे. इंटरनेट सेवा बंद करून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
दंगलप्रकरणी ३९ जणांची नावे निष्पन्न झाली असून एकूण १०० संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील १९ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आणखी ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पुसेसावळी गावात काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर देवदेवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणावरुन गावात गेले काही दिवस धुसफूस सुरु होती. त्यातच रविवारी सायंकाळी दोन युवकांच्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली. त्याला उत्तर देणारी पोस्ट लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली. तद्नंतर मोठ्या प्रमाणावर जमाव जमला आणि दंगलीला सुरुवात झाली. जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन वाहने जाळली. व्यावसायिकांच्या हातगाड्यांची मोडतोड केली. त्यानंतर संतप्त जमाव मशिदीकडे गेला. तेथे उपस्थित असणार्या नागरिकांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. जाळपोळ करणारा जमाव कमालीचा हिंस्त्र बनला. आरडाओरडा ऐकून मशिदीमधून काहीजण बाहेर आले. तेथे मशिदीतून बाहेर आलेल्यांवर संतप्त जमाव अक्षरश: तुटून पडला आणि हाणामारीला सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार फरशी, दांडकी, दगडांनी मारहाण करण्यात आली. यात नूरहसन लियाकत शिकलगार (वय 32) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर दहाहून अधिक जण जखमी झाले. यामध्ये अब्दुल कादर जैलानी (वय 55), वसीम बालम मुल्ला (वय 30, दोघे रा. वाघेरी, ता. कराड), सरफराज ईलाही बागवान (वय 45), सोहेल नजीर बागवान (वय 22), अमन असिफ बागवान (वय 20), समीर ईलाही बागवान (वय 50), अस्लम बाबासाहेब शेख (वय 32), अकिल नजीर इनामदार (वय 40), इस्माईल बशिर बागवान (वय 33), सैफअली हारुण बागवान (वय 29, सर्व रा. पुसेसावळी, ता. खटाव) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर सातारा व कराड येथे उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच औंध पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अचानक जमाव वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यानंतर तातडीने सातारा जिल्हा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर पोलिस कुमक पाठवण्यात आली. पोलिसांनी शांततेचे आवाहन करत जमाव पांगवला. रात्रभर पोलिसांनी गस्त केली. जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख स्वत: घटनास्थळी राहिले. संपूर्ण रात्रभर ते ठाण मांडून होते. यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर, डी. वाय. एस. पी. अश्विनी शेंडगे व अन्य अधिकारीही तळ ठोकून होते. विभागातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी, राखीव फोर्सने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. सद्यस्थितीला पुसेसावळीतील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.
पुसेसावळीतले वातावरण तणावपूर्ण असून गावात कर्फ्यू लावण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.