पुणे : खासदार धैर्यशील माने यांना लोक धडा शिकवतील : राजू शेट्टी

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा करताना राजू शेट्टी
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा करताना राजू शेट्टी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणूक मी लढविणार असून मी विजयी होणार असल्याचा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले असून त्यांच्या घरावर शिवसेनेने मोर्चा काढला याकडे आपण कसे पाहता, असे छेडले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारबरोबर नाही आणि भाजपाबरोबरही नसून, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. त्यामुळे मी यावर फार बोलणार नाही, मात्र खासदार माने यांना लोक धडा शिकवतील असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

साखर संकुल येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची थकीत एफआरपी व अन्य प्रश्नांवर त्यांनी दुपारी भेट घेत चर्चा केली आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत संघटनेचे प्रकाश बालवडकर, बापूसाहेब कारंडे, सुरेंद्र पंढरपूरे, गणेश महाजन, अँड. योगेश पांडे व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सध्याच्या सरकारात कृषीमंत्रीच नाहीत

राज्य सरकारवर टीका करताना शेट्टी म्हणाले, सत्तेच्या सारीपाटवर राजकारणी खेळत असताना शेतकरी मात्र संकटात आहे. खरीप हंगामापूर्वी महाविकास आघाडीमधील कृषी मंत्री हवा बदलासाठी गोहाटी येथे गेले आणि आतातर सध्याच्या सरकारमध्ये कृषी मंत्रीच नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी प्रश्नाकडे तत्काळ लक्ष द्यावे. कारण राज्यातील २३ जिल्ह्यातील ८ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. दोनच मंत्र्यांचे सरकार काम करत आहे. बोगस बियाणांचा सुळसुळाट झाला. असून रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांना उसाची एफआरपी एकरकमीचे मिळाली पाहिजे ही आमची मागणी असून, आगामी हंगाम त्याशिवाय सुरू करू देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यात अद्यापही एफआरपीचे १ हजार ५३६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. ही उसाची थकीत रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन टप्यात एफआरपी ददेण्याच्या कायद्यास आम्ही उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कारखाने उसाच्या वजनात काटामारी करतात, दोन दोन टन ऊस कमी दाखविला जातो, त्यासाठी ऑईल कंपन्यांच्या पेट्रोल पंपाना एकच संगणक प्रणालीचा उपयोग साखर कारखान्यांत करण्याची मागणी आम्ही केली आहे. तसेच त्याचा पासवर्ड साखर आयुक्ताकडे ठेवावा अशी मागणीही केली असून साखर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे शेट्टी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news