नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते १५ मे पासून या पदाचा ताबा स्वीकारणार आहेत. याबाबतची माहिती विधी आणि न्याय मंत्रालयाने दिली आहे. राजीव कुमार हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची जागी घेतील.
सुशील चंद्रा यांचा १४ मे रोजी कार्यकाल संपत आहे. त्यानंतर १५ मे रोजी राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार हाती घेतील. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी राजीव कुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राजीव कुमार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. त्यांनी B.SC, LL.B, PGDM आणि MA Public Policy असे शिक्षण घेतले आहे. बिहार/झारखंड केडर १९८४ बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले राजीव कुमार फेब्रुवारी २०२० मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. केंद्रातील अनेक मंत्रालयात तसेच आपल्या बिहार-झारखंड केडरमध्ये त्यांनी ३६ वर्षांची सेवा बजावली आहे. राजीव कुमार यांनी सामाजिक, वन आणि पर्यावरण, मानव संसाधान, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातही उल्लेखनीय काम केलेले आहे.
राजीव कुमार १ सप्टेंबर २०२० रोजी ECI मध्ये निवडणूक आयूक्त रुजू झाले होते. निवडणूक आयोगात येण्याआधी राजीव कुमार हे Public Enterprises Selection Board चे अध्यक्ष होते. ते एप्रिल २०२० मध्ये पीईएसबीचे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते.