कोल्हापूर : कागल तालुक्याच्या राजकीय फडात श्रीरामावरून ‘रामायण’!

कोल्हापूर : कागल तालुक्याच्या राजकीय फडात श्रीरामावरून ‘रामायण’!
Published on
Updated on

कागल; बा. ल. वंदुरकर : रामनवमी आणि जन्माचे पुरावे, त्यानंतर सुरू झालेले श्रीरामाच्या बदनामीचे रामायण यामुळे गेल्या आठवडाभरापासून कागल तालुक्यात राजकीय आरोप – प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. जातीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आल्याने तालुक्यातील महाआघाडी पुन्हा एकदा भक्कम झाली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे विरुध्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाटगे हे महाआघाडीच्या रूपाने एकत्र आले आहेत. मात्र, संजय मंडलिक यांचे चिरंजीव हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांची वेगळी भूमिका सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

हसन मुश्रीफ यांचा जन्म रामनवमीला झालेला नाही. त्याबाबत गोळा करण्यात आलेल्या पुराव्याची कागदपत्रे तसेच 'गोकुळ' दूध संघाने दिलेल्या जाहिरातीमध्ये मुश्रीफ यांच्या नावांमध्ये रामाचा एकेरी उल्लेख केल्याने भावना दुखावल्या कारणावरून मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी समरजितसिंह घाटगे यांनी कागल पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.

या मोर्चात काही घोषणा प्रकर्षाने ठळक करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले. यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांनी श्री राम मंदिरामध्ये राजकीय अड्डा बनवला आहे आणि रामाची बदनामी केली आहे. तसेच महामार्गावर लावण्यात आलेल्या फलकावर देखील रामाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे मंदिर प्रशासनावर गुन्हा दाखल करावा या मागणी करिता मोर्चा काढण्यात आला.

दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप करणार्‍या कार्यकर्त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून दोन्ही बाजूने रामायण सुरू झाले आहे. या रामायणाचा दुसरा अध्याय सध्या नेते मंडळींकडून सुरू झाला आहे. यामध्ये रामनवमी त्यानंतर जन्माची पुरावे आणि जातीय राजकारण याबाबत नेतेमंडळी आक्रमक होऊ लागले आहेत.

कौलगे येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ यांनी माणसाने कोणत्या दिवशी जन्मावे याचे संशोधन व्हावे ही बाब कागल तालुक्यात दुर्दैवी ठरत आहे. संजय मंडलिक हे माझे छोटे गुरुबंधू आहेत. पुढील खासदार देखील तेच असल्याचे त्यांनी आत्ताच जाहीर करून टाकले आहे. तर खासदार संजय मंडलिक यांनी देखील तालुक्यात जातीवाद वाढू नये यासाठी संजय घाटगे, हसन मुश्रीफ आणि आम्ही एकत्र आहोत. कोण कधी जन्माला आला यापेक्षा त्यांनी केलेले काम महत्वाचे आहे. असे स्पष्ट करून तालुक्यात महाआघाडी मजबूत एकसंध असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उलट सुलट पोस्ट व्हायरल झालेल्या होत्या. त्यानंतर मंडलिक आणि मुश्रीफ गटांमध्ये सुसंवाद फारसा राहिलेला नव्हता. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये खासदार संजय मंडलिक यांनी वेगळी भूमिका घेऊन स्वतंत्र आघाडी निर्माण केली होती. त्यामुळे मंडलिक मुश्रीफ यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते, मात्र अचानक कौलगे येथे झालेल्या कार्यक्रमात तीन नेते एकत्र येऊन त्यांनी आम्ही तिघे मधल्या काळात एकमेकाला विसरलो होतो, आता मात्र एक आहोत. जातिवाद रोखणार आहोत असे त्यांनी ठणकावले.

वीरेंद्र मंडलिक यांच्या रोखठोक भाषणाची चर्चा

दरम्यान, एकोंडी येथे झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये समरजितसिंह घाटगे आणि वीरेंद्रसिंह मंडलिक एकत्र आले होते. या कार्यक्रमात मात्र वीरेंद्र मंडलिक यांनी वेगळी भूमिका मांडली. 'गोकुळ'मध्ये विश्वासाने विश्वास घात केला. आमची मैत्री समजतसिंह घाटगे यांच्या बरोबर आहे. एकत्र येण्याच्या दृष्टीने आमचे बिनसलेले नाही. आता आम्ही दोघे एकत्र आहोत हीच मुहूर्तमेढ आहे. त्यामुळे कागल तालुक्याच्या राजकारणात श्रीरामाच्या नावावरून आणि जन्माच्या पुराव्यावरून भविष्यात येणार्‍या दोन्ही नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news