कोल्हापूर : आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांचा ‘वॉच’

कोल्हापूर : आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांचा ‘वॉच’
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट, मजकुरावर कोल्हापूर पोलिसांनी वॉच ठेवला आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकाचे ट्विटर अकाऊंट थेट पोलिसांनी कारवाई करून डिलिट केले. यापुढे अशा कोणत्याही पोस्ट टाकताना तरुणांनी विचार करावा. कोल्हापूर पोलिस आक्षेपार्ह पोस्टबाबत अ‍ॅक्शन मोडवर असून तुमची एखादी चुकीची पोस्ट तुमचे करिअर बिघडवू शकते.

इतिहासातील घटनांबाबत, राष्ट्रपुरुषांबाबत किंवा एखाद्याचे समर्थन करणारी पोस्ट व्हायरल करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. राज्यभरात अशा घटनांचे अक्षरश: पेवच फुटले आहे. सोशल मीडियावरून एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हाने देण्याचे प्रकार घडले आहेत. कोल्हापुरातही अशाच एका वादग्रस्त पोस्टवरून दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापूर पोलिसांनी मात्र यापुढे कोणतीही गय न करता अशा सोशल मीडिया वापरकर्त्यांवर वॉच ठेवून वेळीच त्यांना आवर घालण्याचे धोरण अवलंबले आहे.

सोशल मीडियावर वॉच

सध्या पोलिस मुख्यालयातील सायबर पोलिस ठाण्याचे एक पथक यावर काम करत आहे. सोशल मीडियावर 'ट्रेंडिंग' पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. या पोस्ट कोणत्या उद्देशाने टाकण्यात आल्या?, त्या पोस्टवर उमटणार्‍या प्रतिक्रिया?, या पोस्टबाबत असणारे लोकांमधील आकलन?, वादग्रस्त पोस्टवरून कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता? याची पडताळणी केली जात आहे. अशा अकाऊंटबाबत तातडीने स्थानिक पोलिसांना सतर्क करून संबंधितांचा शोध घेतला जात आहे.

ट्विटर अकाऊंट केले डिलिट

ट्विटर हँडलवरून अशीच एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्याची माहिती सायबर पोलिसांकडे आली. यावर तातडीने अ‍ॅक्शन घेऊन हे खाते डिलिट करण्यात आले. तसेच जुना राजवाडा पोलिसांकडूनही संबंधितावर कार्यवाही करण्यात आली. सायबर पोलिसांनी अशा अकाऊंटची माहिती संकलित करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू ठेवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news