पुणे : भकाभका धूर ओकणारी ‘पीएमपी’ आता होणार इतहिासजमा

पुणे : भकाभका धूर ओकणारी ‘पीएमपी’ आता होणार इतहिासजमा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रस्त्यावर धावताना भकाभका धुराचे लोट सोडणारी पीएमपी तुम्ही पाहिली असेल. परंतु, आता यापुढे अशी बस तुम्हाला अजिबात दिसणार नाही. एकेकाळी शहराच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारी पीएमपी आता शून्य प्रदूषणाकडे जात असल्याचे दिसत आहे.
पीएमपीने ताफ्यातून डिझेल गाड्या काढून टाकण्यासाठी उचललेले पाऊल आता पूर्णत्वाकडे चालले आहे. ताफ्यात फक्त 233 मिडी बसच डिझेलवरील उरल्या असून, त्यादेखील इलेक्ट्रिक करण्याचा पीएमपीचा प्रस्ताव आहे.

पीएमपीच्या ताफ्यात गेल्या दहा वर्षांपूर्वीच्या काळात सर्वच्या सर्व बस डिझेलवर धावणार्‍या होत्या. कालांतराने ताफ्यात सीएनजीवरील बसचा समावेश झाला. त्यानंतर आता इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल होत आहेत. मध्यंतरीच्या काळात पीएमपी प्रशासनाने आयुर्मान संपलेल्या आणि खूपच दयनीय अवस्था झालेल्या बस ताफ्यातून काढून टाकल्या. मात्र, पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पदभार स्वीकारताच सर्व डिझेलवरील बस ताफ्यातून काढून पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ताफ्यातील सर्व डिझेल बस काढण्यात आल्या आहेत. डिझेलवर धावणार्‍या आता फक्त मिडी बसच पीएमपीच्या ताफ्यात आहेत.

ई-बसमध्ये रूपांतर करण्याचा उपक्रम

पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील सर्व मोठ्या डिझेल बस काढून टाकल्या आहेत. आता डिझेलवरील मिडी बस बाकी आहेत. याच मिडी बस इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचा पीएमपीने नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे नियोजन पीएमपीचे मुख्य समन्वयक सुनील बुरसे करीत आहेत. त्यानुसार एका डिझेल बसचे सध्या पीएमपीने इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर केले आहे. पाहणीसाठी आणि अंतिम अहवालासाठी अ‍ॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडे (एआरएआय) ही बस देण्यात आली आहे. मान्यता मिळाल्यास विनाखर्च आणि विनामनुष्यबळ पीएमपी ताफ्यातील 233 मिडी बससुद्धा इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करणार आहे.

इंधनाचे वाढते दर आणि शहरात होणार्‍या प्रदूषणामुळे पीएमपीच्या वरिष्ठपातळीवर डिझेल बस ताफ्यातून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डिझेलवरील बस ताफ्यातून काढण्यात येत आहेत. डिझेलवरील फक्त आता मिडी बसच बाकी आहेत. त्यांचेदेखील लवकरच इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
                                         – दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

–  पीएमपी ताफ्यातील एकूण बस – 2156

  • स्वमालकीच्या बस – 1156
  • ताफ्यातील डिझेल बस – 233 मिडी बस (लहान आकाराच्या)
  • भाडेतत्त्वावरील बस – 900
  • सीएनजीवरील स्वमालकीच्या बस – 865
  • सीएनजीवरील भाडेतत्त्वावरील बस – 622
  •  इलेक्ट्रिक बस 180 (ऑनरोड)
    (आणखी नव्या बस येत आहेत.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news