सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागासह धरण परिसरात पावसाची संततधार कायम असून नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने शुक्रवार दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोयना धरणातही वेगाने पाणीसाठा वाढत आहे. रविवारी रात्रीपासून सातार्‍यात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. पश्चिम भागात तर जोरदार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांना पुरसद़ृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. डोंगरदर्‍यामध्ये छोटे-मोठे धबधबे खळाळू लागले आहेत.

पावसाअभावी खोळंबलेली भात लागणीची कामे सातारा, जावली, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली व खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात युध्दपातळीवर सुरू आहेत. पावसामुळे पश्चिम भागातील डोंगरदर्‍या व घाटरस्त्यावर दरडी पडण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रशासनामार्फत रस्त्यावर पडलेल्या दरडी त्वरित हटवण्यात येत आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील धावरी-एरणे रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पश्चिम भागात जोरदार पाऊस असला तरी जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. फलटण, माण व खटाव तालुक्यात ओढे, नाले, तलाव अजूनही कोरडे ठणठणीत आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे सातारा 23.5 मि.मी., जावली 44.0 मि.मी., पाटण 66.3 मि.मी., कराड 20.2 मि.मी., कोरेगाव 8.6 मि.मी., खटाव 6.9 मि.मी., माण 6. 1 मि.मी., फलटण 1.2 मि.मी., खंडाळा 6.2 मि.मी., वाई 19.3 मि.मी. महाबळेश्वर 104.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरी 25.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत सरासरी 309.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण सरासरीच्या 30.4 टक्के इतका पाऊस झाला आहे.

धरणातील पाणीसाठा 50.61 टक्क्यांवर

सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा 50.61 टक्के झाला आहे. कोयना धरणात 48.51 टक्के पाणीसाठा असून धरणात 59 हजार 977 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. धोम धरण 50.47 टक्के भरले असून धरणात 7 हजार 152 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. धोम बलकवडी धरणात 84.34 टक्के पाणीसाठा झाला असून धरणात 1 हजार 393 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. कण्हेर धरणात 44.11 टक्के पाणी साठले असून धरणात 5 हजार 430 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. उरमोडी धरणात 46.53 टक्के पाणीसाठा झाला असून 3 हजार 600 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तारळी धरणात 81.51 टटक्के पाणीसाठा असून 4 हजार 22 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. मध्यम प्रकल्प असणारे येरळवाडी 3.47 टक्के, नेर 19.47 टक्के, राणंद 4.42 टक्के, आंधळी 22.14 टक्के, नागेवाडी 26.67 टक्के, मोरणा 70.46 टक्के, उत्तरमांड 39.77 टक्के, महू 77.06टक्के, हातगेघर 32.00 टक्के, वांग (मराठवाडी)मध्ये 37.87 टक्के पाणीसाठा झाला आहे.

       हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news