Operation Lotus : दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस फेल; ‘आप’चा दावा

file photo
file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत राजकीय भूकंप (Operation Lotus) होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या (Aam Aadmi Party's MLAs) महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आपचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती पुढे आली होती. पण आजच्या बैठकीला आपचे ६२ पैकी ५३ आमदार उपस्थित राहिल्याचा दावा आपने केला आहे.

भाजप दिल्लीतील केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी आप आमदारांना धमकावत आहे आणि त्यांना आमिष दाखवत आहे, असा आरोप आपने (AAP) केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आप आमदारांना २० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आपचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात होते. (Operation Lotus)

'आप'चे सर्व आमदार पक्षासोबत आहेत आणि पक्षासोबतच राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप आमदारांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार येतील अशी अपेक्षा आहे, असे दिल्लीच्या आप आमदार आतिशी यांनी म्हटले होते.

दरम्यान, दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला आपचे ६२ पैकी ५३ आमदार उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. तर मनीष सिसोदिया हिमाचलमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी इतर आमदारांशी फोनवर संवाद साधला आणि प्रत्येकाने आपण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत असल्याची ग्वाही दिली असल्याची माहिती आपचे आमदार सौरव भारद्वाज यांनी दिली.

भाजपने आमच्या १२ आमदारांशी संपर्क साधून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना ४० आमदार फोडायचे होते आणि त्यासाठी प्रत्येकाला २० कोटींची ऑफर दिली होती, असा दावा सौरव भारद्वाज यांनी केला.

७० सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेत सत्ताधारी आप पक्षाचे ६२ आमदार आहेत. आम आदमी पार्टीच्या नेत्यांना भाजप विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप आप नेते, राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या आमदारांना २० कोटींची ऑफर दिली असल्याचा आरोप सिंह यांनी काल केला होता. भाजप दिल्लीतील आपचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याबाबत जे घडले ते इतर आमदारांसोबत केले जात असल्याचा दावा सिंह यांनी केला. मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

"आम्ही केजरीवाल यांचे सैनिक आहोत.आम्ही विकले जाणार नाही.आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला.परंतु,आमच्या आमदारांने त्यांचे कारस्थान उघड केल्याचे संजय सिंह यावेळी म्हणाले.त्याचवेळी आपचे नेते सोमनाथ भारती यांनीही भाजपचे लोक माझ्याकडे आल्याचे सांगितले.आमच्याकडे या नाहीतर मनिष सिसोदिया यांच्यासारखी तुमची देखील अवस्था करु, असा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे सोमनाथ भारती यांनी सांगितले.आप आमदार भारती यांच्यासह अजय दत्त,कुलदीप तसेच संजीव झा यांना भाजपने प्रत्येकी २० कोटींची ऑफर दिल्याचा दावा सिंह यांनी केला.

सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने मनिष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने ईडीकडे महत्त्वाची कागदपत्रे सोपवली होती. त्यानंतर ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित एफआयआर आणि अन्य दस्ताऐवजांची माहिती ईडीला सोपवली होती. त्यामुळे सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह १४ जणांविरोधात लुक आउट सर्कुलर जारी केले होते. यामध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या नावाचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news