दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी ऱ्होड्स हा क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. त्याने १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या इंझमाम – उल – हकला धावबाद केले होते तो क्षण क्रिकेटच्या इतिहासातील क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतील ऑयकॉनिक क्षण म्हणून गणला जातो. तेव्हापासूनच एकाद्या चांगल्या क्षेत्ररक्षकाची तुलना ही जॉन्टी ऱ्होड्सबरोबर केली जावू लागली.
आता तब्बल १९ वर्षांनी या ऐतिहासिक क्षणाची पुनरावृत्ती झाली आहे. नेपाळमध्ये सुरु असलेल्या एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये एका खेळाडूने जॉन्टी ऱ्होड्सप्रमाणे हवेत डाईव्ह मारत फलंदाजाला धावबाद केले. या नेपाळी जॉन्टी ऱ्होड्सचे नाव आहे भुवन कार्की. त्याने हुबेहूब जॉन्टी ऱ्होड्सप्रमाणे फलंदाजाला हवेत डाईव्ह मारत धावबाद केले.
भराहवा ग्लॅडियेटर आणि पोखरा राईनोज यांच्यात झालेल्या सामन्यात ग्लॅडियोटर फलंदाजी करत असताना भुवन कार्कीने हा धावबाद केला. ग्लॅडियेटरचा फलंदाज रिटर्ड लेवी आणि ऋत गौतम फलंदाजी करत होते. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडवर गौतमने चोरटी धाव घेण्यासाठी चेंडू हळुवारपणे कव्हर्सच्या दिशेने खेळला. मात्र धाव घेण्यादरम्यान नॉन स्ट्रयकरवर उभ्या असलेला लेवी गोंधळला. दरम्यान भुवनने चपळाई दाखवत चेंडू कव्हर्समध्ये पकडला आणि वेगाने तो नॉन स्ट्रायकरच्या यष्ट्यांकडे धावत सुटला.
दरम्यान, फलंदाजही क्रिजमध्ये परतण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून भुवनने यष्ट्यांवरच झेप घेतली आणि अगदी जॉन्टी ऱ्होड्स प्रमाणाचे फलंदाजाला धावबाद केले. या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून जॉन्टी ऱ्होड्सने रचलेल्या इतिहासाच्या आठवणी ताज्या झाल्या.
जर भुनने हा अप्रतिम धावबाद केला असला तरी राईनोसने हा सामना ७ विकेट राखून जिंकला. या विजयाबरोबरच राईनोस अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. रोड्सने इंझमामला धावबाद केल्यानंतर पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेकडून हरला होता. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा २० धावांनी पराभव केला होता.