नवी दिल्ली, पीटीआय : ऐतिहासिक 'चांद्रयान-3'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर महत्त्वाकांक्षी मानवयुक्त गगनयान मोहिमेसाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) टीम सज्ज झाली आहे. पुढील वर्षी गगनयान तिघांना घेऊन अवकाशात उड्डाण करणार असल्याची माहिती 'इस्रो'चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी शनिवारी दिली.
अमेरिका, रशिया, चीन आदी देशांनी मानवयुक्त यान अवकाशात पाठविले आहे. गगनयानाच्या यशानंतर मानवयुक्त यान पाठविणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. 'चांद्रयान-3'च्या यशामुळे 'इस्रो'मधील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी आता गगनयानावर लक्ष केंद्रित केले आहे. 'चांद्रयान-3'साठी 'एलव्हीएम-3' अग्निबाणाचा वापर केला आहे. यामुळे गगनयान मोहिमेला बळ मिळाले आहे. याच अग्निबाणाच्या साहाय्याने गगनयानाचे अवकाशात उड्डाण होणार आहे.
गगनयानात तीनजण असतील. या तिघांना घेऊन यान 400 कि.मी. अंतरावरील पृथ्वीच्या कक्षेत झेपावेल. ही सफर तीन दिवसांची असणार आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गगनयानाचे सुखरूप लँडिंग केले जाणार असल्याची माहिती सतीश धवन अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी दिली. 'एलव्हीएम-3' रॉकेटची उंची 44.3 मीटर असून, 'चांद्रयान-3'च्या प्रक्षेपणासाठी या रॉकेटने महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे. मानवयुक्त गगनयानाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी हे रॉकेट सक्षम असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले.
'एलव्हीएम-3'ची क्षमता 'चांद्रयान-3' प्रक्षेपणानंतर सिद्ध झाली आहे. या रॉकेटची रचना मजबूत आहे. सॉलिड, लिक्विड आणि क्रायोजेनिक अशा तीन टप्प्यांत या अवजड रॉकेटची अंतर्गत रचना असेल. साधारणत:, 4,000 किलो वजनाच्या अवकाश यानाचे प्रक्षेपण करण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेसाठी या रॉकेटच्या रचनेत फारसे बदल करावे लागणार नाहीत.
'ह्युमन रेटेड एलव्हीएम-3' असे गगनयानासाठी वापरल्या जाणार्या रॉकेटचे नामकरण करण्यात आले आहे. 'चांद्रयान-3'चे चंद्रावर ऑगस्टमध्ये यशस्वी लँडिंग होईल. त्यानंतर पुढील वर्षाच्या अखेरीस मानवयुक्त गगनयान अवकाशात झेपावेल, असे सोमनाथ यांनी आज सांगितले.