Nagar : मुळा, भंडारदरातून जायकवाडीला पाणी न सोडण्यावर नेत्यांचे एकमत

Nagar : मुळा, भंडारदरातून जायकवाडीला पाणी न सोडण्यावर नेत्यांचे एकमत
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. येत्या महिनाभरात पाणीटंचाई परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडू नये असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने पारित केला आहे. नियोजन समितीचा ठराव तत्काळ राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा ठराव देखील झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची तसेच गोदावरी, मुळा व भंडारदरा धरण कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी सिन्नरचे आमदार कोकाटे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मुळा, भंडारदरा-निळवंडे या धरणांतून यंदा साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचे निर्देश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. यंदा जिल्ह्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास जिल्हाभरातील सर्वच विरोध करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांच्या आमदार, खासदार व सदस्यांनी जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला. याबाबत सर्वपक्षीय ठराव देखील मंजूर करुन राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. सध्या हा प्रश्न न्यायालयात आहे. नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मराठवाड्यातील नेतेमंडळी आणि जनतेने देखील यंदा सहकार्य करावे, असे आवाहन त्यांना करणार असल्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जाणार आहे. संगमनेर, श्रीरामपूर या तालुक्यांत पहिल्यांदा उभारले जाणार आहे. जिल्ह्यात रोजगार कसा उपलब्ध होईल याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार केला जात आहे. सुपा एमआयडीसीचे विस्तारिकरण प्रस्तावित आहे. आयटी पार्क उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक देखील जिल्ह्यात उभारण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला गेला. यासाठी शासनाकडून तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उभारला जाणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

नेवाशात ज्ञानेश्वर सृष्टी
जिल्ह्यासाठी पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. नेवाशात 'ज्ञानेश्वर सृष्टी' निर्माण केली जाणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून व जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे. भुईकोट किल्ला संरक्षण विभागाकडे आहे. याबाबत खासदार डॉ. सुजय विखेे पाटील यांनी संरक्षणमंत्री यांची भेट घेतलेली आहे. हा किल्ला राज्य शासनाकडें वर्ग होण्याची प्रक्रिया सुरु आहे. या किल्ल्याचे विकासासाठी करण्यास 95 कोटींचा निधी उपलब्ध असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news