खोर; पुढारी वृत्तसेवा: खोर (ता. दौंड) येथील ओढ्यावरील पूल अखेर पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. १७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. परिणामी खोर-भांडगाव हा मुख्य रस्ता वाहतूकीसाठी कायम स्वरूपी बंद झाला असल्याने खोर गावाचा संपर्क तुटला आहे.
खोर येथील बंद पडलेल्या पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे अनेकदा वृत्त दै. 'पुढारी' मधून छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते. अनेकदा या पुलाच्या कामाबाबतचा हलगर्जीपणा दाखवून दिला गेला तर, गावाला फार मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरी देखील दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही.
अखेर हेच घडले आणि मान्सून परतीच्या जोरदार पावसाने अखेर खोरचा पूल पाण्यात वाहून गेला. दरम्यान, मुसळधार पावसाने वीज पुरवठा खंडीत झाला असून, मोबाईलला रेंज नसल्याने ग्रामस्थांचा रस्त्याबरोबर मोबाईलचा देखील संपर्क तुटला आहे. गावाचा संपर्क तुटला असून, मुलांना शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.