जोतिबा चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक दाखल

जोतिबा चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक दाखल
Published on
Updated on

जोतिबा डोंगर; पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध— प्रदेश, तेलंगणा, गोव्यासह अनेक राज्यांतून लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. सोमवारी सकाळपासून मानाच्या सासनकाठ्या येण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या मानाच्या निनाम पाडळी गावच्या सासनकाठीचे पूजन देवस्थान समितीचे सहायक सचिव महादेव दिंडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्या हस्ते पार पडले. मंगळवारी सायंकाळी हस्त नक्षत्रावर साडेपाच वाजता श्रींचा मुख्य पालखी सोहळा होणार असून तत्पूर्वी दुपारी 12 पासून सासनकाठ्यांची मिरवणूक निघणार आहेे.

प्रशासनाकडून सर्व तयारी झाली असून कडक पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. उत्तर दरवाजात सासनकाठी मिरवणुकीअगोदर एकेरी मार्ग करण्यात येणार आहे तसेच सासनकाठी मिरवणूक मार्ग व पालखी सोहळा मार्ग यावर बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्याआहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित, तहसीलदार माधवी शिंदे, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग यांनी सासनकाठी मिरवणूक व पालखी सोहळा मार्गाची सोमवारी पाहणी केली. वाहतूक पोलिसही जागोजागी तैनात करण्यात आले असून वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

अन् व्यापार्‍यांनी बंद पुकारला

चैत्र यात्रेच्या आढावा बैठकीत व्यापारी आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत यात्रेच्या मुख्य दिवशी एकेरी मार्ग करण्याचा ठराव झाला होता. याला व्यापार्‍यांनी सहमती दिली होती. मात्र सोमवारी सकाळीच उत्तर दरवाजा येथे एकेरी मार्ग केल्याने भाविक, ग्रामस्थ व पोलिस यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. याचा फटका व्यापार्‍यांनाही बसला. यामुळे सर्व व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद करून निषेध केला. अखेर प्रशासनाने मध्यस्थी करत मार्ग खुला केल्यावर व्यापार्‍यांनी दुकाने चालू केली

फाळकेवाडी गावाची मानाची सासनकाठी तब्बल 100 फूट उंच

फाळकेवाडी गावची सासनकाठी सर्वात उंच मानली जाते. यावेळी सासनकाठीची उंची 100 फुटांच्या आसपास आहे. सोमवारी ही सासनकाठी मंदिरात आल्यावर शिखरासोबत स्पर्धा करत होती. यावेळी अनेक भाविकांनी या मानाच्या सासनकाठीचे दर्शन घेतले.

भेसळयुक्त पेढ्यांवर कारवाई

यात्रा काळात भेसळयुक्त पेढ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. दिवभरात सुमारे तीन हजार किलो भेसळयुक्त पेढे जप्त करण्यात आले.

डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे भाविकांना मंदिरात मोफत उपचार

सालाबाद याहीवर्षी चैत्र यात्रेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे मंदिरात हत्तीमहल याठिकाणी भविकांना मोफत उपचार सेवा सुरू असून असंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news