IPL 2023 : कोण तुपाशी, तर कोण राहणार उपाशी?

IPL 2023 : कोण तुपाशी, तर कोण राहणार उपाशी?
Published on
Updated on

कोची, वृत्तसंस्था : नवीन वर्षाचे आगमन जवळ येईल तसे आयपीएलची उत्सुकता वाढत जाते, पण आयपीएलपूर्वी होणार्‍या लिलावाबाबतही तेवढीच उत्कंठा असते. आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सत्रासाठी मिनी लिलाव कोची येथे आज होणार आहे. यामध्ये 87 स्लॉटसाठी 405 खेळाडू आपले नशीब आजमावतील. 10 संघांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई होणार आहे. बेन स्टोक्स, सॅम कुरेन, कॅमेरून ग्रीन, केन विल्यम्सन आणि जो रूट यांसारखे अनेक हाय-प्रोफाईल खेळाडू यावर्षी खेळाडूंच्या पूलमध्ये आहेत. क्रिकेटपटूंवर धनवर्षाव करणार्‍या या लिलावात यंदा कोण तुपाशी जेवणार आहे तर कोण उपाशी राहणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.

आयपीएल मिनी लिलावाद्वारे संघटनांना त्यांच्या फ्रँचाईझीमध्ये काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळते. इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडू टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर फार्मात आले आहेत. यामध्ये हॅरी ब्रूकसारख्या युवा स्टारचा समावेश आहे. लिलावादरम्यान फ्रँचाईझींमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबाद 42.25 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या पर्ससह मिनी लिलावात प्रवेश करेल, तर पंजाब किंग्ज 32.2 कोटी आणि लखनौ सुपर जायंट्स 23.35 कोटी रुपयांसह उरले आहेत. पर्सच्या बाबतीत हे दोघे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सकडे फक्त 7.05 कोटी रुपये आहेत, तर रॉयल चॅलेंजर्सकडे 8.75 कोटी रुपये आहेत.

आयपीएलमध्येही इम्पॅक्ट प्लेयरचा नियम (IPL 2023)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेटच्या आगामी हंगामात इम्पॅक्ट प्लेयर हा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 'बीसीसीआय'ने 'आयपीएल' स्पर्धेत सहभागी दहाही संघांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली. प्रभावी खेळाडू हा केवळ भारतीय असेल असे 'बीसीसीआय'कडून सांगण्यात आले आहे. 'आयपीएल' संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते; परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास प्रभावी खेळाडू म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परदेशी खेळाडूंचा आकडा चारपेक्षा अधिक होऊ शकत नाही, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले आहे.

लिलाव करणारा कोण आहे सूत्रसंचालक? (IPL 2023)

ह्यू एडमीड्स हा 2023 चा लिलावकर्ता असेल, ज्याने 2018 मध्ये रिचर्ड मॅडले यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. शेवटच्या वेळी, दुर्दैवाने मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी एडमीड्स मध्यभागी चक्कर येऊन कोसळला होता, त्यानंतर चारू शर्माने त्याची जागा घेतली. लिलावाच्या शेवटच्या टप्प्यात तो खेळाडूंच्या शेवटच्या स्लॉटसाठी दुसर्‍या दिवशी परतला होता.

स्टार स्पोर्टस्वर थेट प्रक्षेपण

आयपीएल 2023 चा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. भारतीय वेळनुसार दुपारी 2.30 वाजता याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस् चॅनलवर होणार आहे. तसेच जिओ सिनेमा अ‍ॅप आणि वेबसाईटवर थेट पाहू शकता.

यावेळी राईट टू मॅच कार्ड नाही

आयपीएल 2023 लिलावामध्ये राईट टू मॅच कार्ड वापरता येणार नाही. लिलाव शेवटच्या आवृत्तीतील नियमांचे पालन करेल, जे राईट टू मॅच कार्ड वापरण्यास फ्रँचाईझीला प्रतिबंधित करते. 2018च्या लिलाव प्रक्रियेदरम्यान प्रथम सादर करण्यात आलेले राईट टू मॅच कार्ड, ही एक तरतूद आहे जी एखाद्या संघाने आधीच त्याच्या सेवा घेतल्यानंतर एखाद्या खेळाडूला परत विकत घेण्याची परवानगी देते. मात्र, बराच विचार करून ते टाळण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news