नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय बेरोजगारी दर ( Unemployment Rate ) मागील चार महिन्यातील उच्चांकी स्तरावर पोहचला आहे, असे निरीक्षण सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी ( सीएमआयई ) या खासगी संस्थेने आपल्या अहवालात नोंदवले आहे. 'सीएमआयई'च्या आकडेवारीनुसार देशात डिसेंबर महिन्यातील बेरोजगारी दर हा ७.९ टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्येच तो ७ टक्के होता. तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक ८.३ टक्के नोंदला गेला होता. कोरोना महामारीमुळे २०२१मध्ये देशातील बेरोजगारी दर हा तब्बल ११.८४ टक्क्यांपर्यंत पोहचला होता.
'सीएमआयई'च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात शहरातील बेरोजगारी दर हा ९.३ टक्के झाला. तो नोव्हेंबरमध्ये ८.२ इतका होता. ग्रामीण भागातील आकडेवारी थोडी दिलासादायक आहे. येथे डिसेंबर महिन्यात हा टक्का ६.४ इतका नोंदवला होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये बेरोजगादरी दराचा टक्का ७ इतका होता. डिसेंबर महिन्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे काही राज्यांमध्ये पुन्हा निर्बंधाची चाहू लागली. याचा परिणाम देशातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे.
देशातील सर्वाधिक बेरोजगारी असणारी पाच राज्ये ( कसांत बेरोजगारी दर टक्का ) : हरियाणा ( 34.1), राजस्थान ( 27.1) झारखंड (17.3), बिहार ( 16 ) जम्मू-काश्मीर ( 15) इतकी नोंदवली गेली आहे. दिल्लीमध्ये बेरोजगारी दराचा टक्का ९.८ इतका नोंदवला आहे. तर महाराष्ट्रात देशातील सर्वात कमी बेरोजगादरी दर असून तो ३.८ टक्के इतका असल्याचेही या आकडेवारी म्हटलं आहे.
कोरोना काळानंतर देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असल्याचे चित्र आहे. अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे आकडेवारी आहे. तसेच डिसेंबर महिन्यात 'जीएसटी'च्या माध्यमातून केंद्र सरकारला १.२९ लाख कोटी रुपये महसुलही मिळाला आहे. मागील सहा माहिन्यापासून जीएसटीतून १ लाख कोटी रुपयांच्या अधिक महसूल प्राप्त होत आहे. तर यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसर्या तिमाहित सरासरी मासिक जीएसटी हा १.३० लाख कोटी रुपये मिळाला आहे. असे असले तरी बेरोजगारी दरात झालेली वाढ ही चिंता वाढवणारी आहे.
देशातील २०२१मधील बेरोजगारी दर
महिना बेरोजगारी दर ( टक्केवारीत )
देश शहर ग्रामीण
जानेवारी ६.५ ८.०९ ५.८१
फेब्रुवारी ६.८९ ६.९९ ६.८५
मार्च ६.५० ७.२७ ६.१५
एप्रिल ७.९७ ९.७८ ७.१३
मे ११.८४ १४.७२ १०.५५
जून ९.१७ १०.०८ ८.७५
जुलै ६.९६ ८.३२ ६.३४
ऑगस्ट ८.३२ ९.७८ ७.६४
सप्टेंबर ६.८६ ८.६२ ६.०६
ऑक्टोबर ७.७५ ७.३८ ७.९१
नोव्हेंबर ७ ८.२१ ६.४४
डिसेंबर ७.९ ९.०३ ६.०४
हेही वाचलं का?