शाबास..! पुणेकराने बनवले भारतातील पहिले ‘स्मार्ट बेबी वॉर्मर किट’

स्मार्ट बेबी वॉर्मर.
स्मार्ट बेबी वॉर्मर.
Published on
Updated on

दिनेश गुप्ता

पुणे : मुदतपूर्व प्रसूती झाल्यावर नवजात शिशूंना वॉर्मरमध्ये ठेवले जाते. मात्र, हे यंत्र स्मार्ट नसल्याने व तज्ज्ञ डॉक्टरांसह नर्सची कमतरता असल्याने जगभरात विकसित देशांच्या तुलनेत भारतात नवजात शिशूंचा मृत्यूदर जास्त आहे. यात भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे. ही बाब लक्षात घेत पुण्यातील सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क संस्थेतील संशोधकांनी स्मार्ट बेबी वॉर्मर किट प्रथमच विकसित केले असून, या क्रांतिकारी स्टार्टअपमधील संशोधनामुळे लाखो नवजात बालकांचे प्राण वाचणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सायन्स व टेक्नॉलॉजीची इमारत आहे. या संस्थेचे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट बेबी वॉर्मर किट अवघ्या अठरा महिन्यांत विकसित झाले आहे. आजवर किटमध्ये ठेवलेल्या नवजात बाळाकडे डोळ्यांत तेल घालून बघावे लागत असे. तसेच या यंत्रात अनेक त्रुटी असल्याने अपघात झाले. या घटनांची दखल घेत कमल सहगल या पुणे येथील संशोधकाने स्टार्टअपच्या माध्यमातून स्मार्ट बेबी वॉर्मर किट बनविण्याचे काम सुरू केले.

प्रयास प्रकल्पांतर्गत मिळाली मदत

पैसे व मार्गदर्शनाअभावी त्यांना पुढे जाता येईना. त्यामुळे त्यांनी सायन्स व टेक्नॉलॉजीचे प्रमुख डॉ. जगदाळे यांची मदत मागितली. डॉ. जगदाळे यांनी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने राबविल्या जाणार्‍या प्रयास प्रोग्रामअंतर्गत स्टार्टअपला सहगल यांच्या प्रकल्पास मंजुरी देत निधी दिला. प्रकल्प मंजूर होताच डॉ. जगदाळेंसह तेथील संशोधकांनी कमल सहगल यांच्या संशोधनास वेग आणला. अवघ्या अठरा महिन्यांत या टीमने देशातील पहिले स्मार्ट बेबी वॉर्मर किट तयार केले.

या स्मार्ट बेबी वॉर्मर किटबाबत दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने कमल सहगल व डॉ. जगदाळे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, भारतात असे यंत्र पहिल्यांदाच तयार झाले असून, 'आयओटी' (इंटरनेट ऑप थिंग्ज) तंत्रज्ञानावर आधारित तंत्र आहे. हे एकप्रकारचे 'रेट्रो-किट' असून, रुग्णालयातील कोणत्याही इन्क्युबेटरमध्ये बसविले की ते इन्क्युबेटर स्मार्ट होते. डॉक्टरांच्या मोबाईलसह रूममधील मोठ्या पडद्यावर बाळाच्या हृदयाच्या ठोक्यापासून ते सर्वप्रकारच्या हालचाली पाहता येतात. काहीही विपरीत घडायच्या आत हे इन्क्युबेटर अलार्म देते. अशाप्रकारचे यंत्र एलसीडी टचपॅनेल व डॅशबोर्डलाही जोडता येते. यावर पुण्यातील मोठ्या नामवंत खासगी रुग्णालयांत ट्रायलही यशस्वी झाल्या असून, लवकरच राष्ट्रीय स्तरावर हे किट वापरण्याच्या हालचाली सुरू आहेत.

स्वयंचलित डेटा कलेक्शन

स्मार्ट इन्क्युबेटर किटला त्यांनी 'स्मार्ट बेबी वॉर्मर' असे नाव दिले असून, यात सर्व डेटा स्वयंचलित पध्दतीने नोंद होतो. यात बाळाच्या सर्व हालचालींसह हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास, रक्तदाब, तापमानासह अनेक नोंदी होतात.
नवजात शिशूंसाठी 'स्मार्ट बेबी वॉर्मर किट' विकसित करण्यात यश आले आहे. या यंत्राची आम्ही पुण्यातील नामवंत रुग्णालयात चाचणी केली असता चांगली निरीक्षणे आली आहेत. लवकरच हे यंत्र सर्व रुग्णालयांत उपलब्ध होऊ शकते.

 – डॉ. राजेंद्र जगदाळे, डायरेक्टर जनरल, सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क, पुणे

माझ्याकडे पैसे व तंत्रज्ञानाची कमतरता असल्याने सायन्स व टेक्नॉलॉजी पार्कची मदत घेतली. त्यांच्या मदतीमुळेच हा प्रयोग यशस्वी झाला. हे किट नवजात शिशू मृत्यूदर कमी करण्याचे मोठे काम करेल.

                                      – कमल सहगल, सीईओ, इन्फ्रामेडटेक, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news