इचलकरंजीतील तयार बॅग थेट अमेरिकेत; कोरोनामुळे चीनवरील विश्वास उडाला

इचलकरंजीतील तयार बॅग थेट अमेरिकेत; कोरोनामुळे चीनवरील विश्वास उडाला
Published on
Updated on

इचलकरंजी; संदीप बिडकर : देशातील बहुतांश भागांमध्ये इचलकरंजीचे कच्चे कापड निर्यात होते. परंतु, इचलकरंजीमध्ये कापडापासून तयार केलेली बॅग थेट अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये पाठविण्याची किमया येथील संतोष कोळी या उद्योजकाने करून दाखविली. कोरोना महामारीनंतर जगातील बहुतांश देश चीनच्या कापड कंपन्यांना ऑर्डरी देणे बंद करू लागले आहेत. या संधीचा लाभ उठवत कोळी यांनी अमेरिकेतील कंपनीशी करार करून पर्यावरणपूरक पिशवी देण्याचा करार केला. मंदीच्या द़ृष्टचक्राच्या गर्तेत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला बाहेर काढण्याची ही सुसंधी मानता येईल.

शहरातील सिंधी, मारवाडी, पंजाबी, गुजराती बंधूंच्या माध्यमातून यापूर्वी शहरातील कापड एक्स्पोर्ट होत होते. परंतु, सध्या कोळी यांच्या माध्यमातून एका मराठी तरुणाने तयार प्रॉडक्ट थेट एक्स्पोर्ट करण्याच्या उद्योगात उडी घेतल्याने हे अभिमानास्पद मानता येईल. शुक्रवारी इचलकरंजीतून बॅगचा पहिला कंटेनर त्यांनी अमेरिकेला रवाना केला. आता इचलकरंजीचा तयार माल थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत गेल्यामुळे ही मोठी संधी इचलकरंजीतील गारमेंट व वस्त्रोद्योगाला प्राप्त झाली आहे.

कोरोनानंतर जगभरातील देशांचा चीनवरील विश्वास उडाला आहे. तसेच जगामध्ये चीननंतर कापड उद्योगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या बॅगसाठी अमेरिका चीनला ऑर्डर देत होती. परंतु, चीनपेक्षा जास्त दर देऊन त्यांनी इचलकरंजीतील मराठी उद्योजकाला काम करण्याची संधी दिली. सध्या कोळी यांच्या कंपनीला दहा महिन्यांत 11 लाख बॅगची ऑर्डर पूर्ण करायची आहे. कोरोना महामारी, मजुरीवाढ, वीज सवलत, सूत दर आदींसह विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळायची असेल, तर व्यवसायाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याचे स्वप्न वस्त्रोद्योगातील उद्योजकांनी पाहिल्यास पुन्हा एकदा वस्त्रोद्योगाला सुवर्णकाळ येईल हे निश्चित.

अमेरिकेमध्ये दिवसाला 5 कोटींपेक्षा जास्त बॅग वापरतात. याचा विचार करता भारताला या व्यवसायात मोठी संधी आहे. त्याचबरोबर जगभरातील देशांचा विचार केला, तर प्रचंड मार्केट उपलब्ध आहे. भविष्यात आम्ही मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीशीही करार करण्याच्या प्रयत्नात आहे. शहरातील नवउद्योजकांनी आहे त्यातच काम न करता आंतरराष्ट्रीय मार्केटमधील संधी हेरून त्याचा फायदा घ्यावा, जेणेकरून उद्योगातील मंदीचे संधीत रूपांतर होईल.

– संतोष कोळी (बाळ महाराज), उद्योजक, इचलकरंजी   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news