‘T20 Ranking’च्या टॉप 10 मधून विराट बाहेर, श्रेयस अय्यरची झेप

T20 Ranking shreyas iyer
T20 Ranking shreyas iyer
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-श्रीलंका टी-20 मालिकेनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी (T20 Ranking) जाहीर केली आहे. याशिवाय न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी, बांगलादेश-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका आणि ICC T20 विश्वचषक पात्रता A च्या सामन्यांनाही क्रमवारीत स्थान मिळाले आहे. टी-20 सांघिक क्रमवारीत भारत 270 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

बाबर आझम टी-20 फलंदाजी क्रमवारीत (T20 Ranking) पहिल्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेचा पाथुम निसांकाने अव्वल 10 मध्ये एन्ट्री घेतली आहे तो सहा स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर पोहोचला आहे, तर भारताचा केएल राहुल चार स्थानांनी घसरून 10 व्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळल्याने विराट कोहली अव्वल 10 मधून बाहेर फेकला गेला आहे. तो आता 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावणारा श्रेयस अय्यर 27 स्थानांची प्रगती करून 18व्या स्थानावर पोहोचला आहे. युएई (UAE)च्या मुहम्मद वसीमला आयर्लंड विरुद्ध सुरेख शतक झळकावण्याचा फायदा झाला. तो 12 व्या स्थानावर पोहचला आहे.

गोलंदाजी क्रमवारीत (T20 Ranking) तबरेझ शम्सी पहिल्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाला भारताविरुद्ध मालिका न खेळण्याचा फटका बसला आहे. तो आता सहाव्या स्थानावर आहे. भारताचा अव्वल गोलंदाज भुवनेश्वर कुमार ठरला आहे. त्याने तीन स्थानांनी पुढे सरकत 17 वे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेचा लाहिरू कुमारा टॉप 40 मध्ये 37 व्या स्थानावर पोहोचला आहे. यूएईचा जहूर खान 17 स्थानांनी झेप घेत 42 व्या स्थानावर तर आयर्लंडचा जोश लिटल 27 स्थानांची प्रगती करत 49 व्या स्थानावर पोहोचले आहेत. यूएईचा रोहन मुस्तफा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तीन स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या स्थानावर, तर न्यूझीलंडचा काईल जेमिसन दोन स्थानांनी घसरून पाचव्या क्रमांकावर पोहचले आहेत. तसेच टीम साऊदीलाही एका स्थानाचा फटका बसला आहे. तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजीत न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे 6 स्थानांनी पुढे सरकत 17व्या स्थानावर गेला आहे.

एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत आफगानिस्तानचा राशिद खान पुन्हा पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे आणि सहा स्थानांचा फायदा घेत तो नवव्या स्थानावर आहे. मुजीब-उर-रहमान एका स्थानाने घसरून पाचव्या तर बांगलादेशचा मेहदी हसन मिराज दोन स्थानांनी घसरून सातव्या स्थानावर आला आहे. फलंदाजीत लिटन दासने कारकिर्दीतील सर्वोत्तम 32 वे स्थान गाठले आहे.

महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडच्या अमेलिया केरने फलंदाजीत पाच आणि गोलंदाजीत चार स्थानांचा फायदा मिळवून 17व्या स्थानावर पोहोचली आहे. याशिवाय अष्टपैलू रँकिंगमध्येही तिने चमकदार कामगिरी केली आहे. यात तिला दोन स्थानांचा फायदा झाला असून ती चौथ्या स्थानावर आहे. भारताकडून फलंदजीत मिताली राज (दुसरे स्थान), गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी (चौथे स्थान), अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा (पाचवे स्थान) अव्वल स्थानावर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news