Himachal Election | हिमाचलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ कुठले? उलट भाजपचे ६-७ आमदार काँग्रेसमध्ये येणार, सुखविंदर सिंह सुक्खू यांचा दावा

Himachal Election | हिमाचलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ कुठले? उलट भाजपचे ६-७ आमदार काँग्रेसमध्ये येणार, सुखविंदर सिंह सुक्खू यांचा दावा
Published on
Updated on

शिमला (हिमाचल प्रदेश) : पुढारी ऑनलाईन; हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सर्वात स्थिर सरकार असेल. काँग्रेसचे ४० आमदार निवडून आले असून इतर ३ आमदार काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार आहे. यामुळे आमचे संख्याबळ ४३ आमदारांचे असेल. आम्हाला काँग्रेसपासून कोणीही तोडू शकणार नाही. उलट आगामी काळात भाजपचे ६-७ आमदार काँग्रेसमध्ये येऊ शकतात, असा दावा सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला भाजपच्या ऑपरेशन लोटसची धास्ती वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याउलट सुक्खू यांनी भाजपचे ७-८ आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावा केला आहे.

सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्रीपदी इच्छुक असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुक्खू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "मी कधीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि मी नेहमीच कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मला कधीच पदाची अपेक्षा नव्हती. काँग्रेसने मला प्रदेश पक्षप्रमुख केले होते. पक्षाने मला खूप काही दिले आणि त्यांच्या आदेशाचे पालन करणे माझे कर्तव्य आहे," असे सुक्खू यांनी म्हटले आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Election) मतदारांनी आपली परंपरा यावेळीही कायम ठेवली. म्हणजेच दर पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यावेळीही मतदारांनी सरकार बदलून टाकले. राज्यातील ६८ पैकी ४० जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून प्रचंड राडा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदावर राज्यातील सहा नेत्यांनी दावा केला आहे. प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, सुखविंदर सिंह, राजेंद्र राणा ठाकूर, चंद्र कुमार, धनीराम शांडिल यांचा त्यात समावेश आहे.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला केवळ ११ जण वेळेवर हजर झाले. पक्ष निरीक्षकही आमदारांची प्रतीक्षा करत तिष्ठत राहिले. यादरम्यान, प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला. प्रतिभा सिंह यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी नारेबाजी त्यांनी केली होती.

प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला खरा; पण त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता उपस्थित नव्हता. सायंकाळच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्यासह मुख्यमंत्रिपदाचे धनीराम शांडिल व राजेंद्र राणा हे अन्य दोघे दावेदारही काँग्रेस कार्यालयात पोहोचले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news