पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा उगवता स्टार हॅरी ब्रूक (Harry Brook) याने आपल्या झंझावाती फलंदाजीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपला सुरेख फॉर्म कायम ठेवत या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही शतक झळकावले. ब्रूकचे हे 9 डावातील चौथे शतक असून या खेळीसह त्याने भारताच्या माजी डावखु-या फलंदाज विनोद कांबळीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ब्रूक नाबाद 184 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीसह तो कसोटी क्रिकेटच्या पहिल्या 9 डावात सर्वाधिक 807 धावा करणारा फलंदाज बनला आहे.
याआधी कसोटी क्रिकेटच्या पहिल्या 9 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या (Vinod Kambali) नावावर होता. कांबळीने या काळात दोन द्विशतके आणि दोन शतकांच्या जोरावर एकूण 798 धावा केल्या होत्या. मात्र इंग्लिश फलंदाज ब्रूकने (Harry Brook) आठशे धावांचा टप्पा पार करून भारताच्या माजी फलंदाजाला मागे टाकून नवा विक्रम नोंदवला आहे.
807* – हॅरी ब्रूक (इंग्लंड)
798 – विनोद कांबळी (भारत)
780 – हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड)
778 – सुनील गावस्कर (भारत)
777 – एव्हर्टन विक्स (वेस्ट इंडीज)
703 – जॉर्ज हेडली (वेस्ट इंडीज)
695 – फ्रँक वॉरेल (वेस्ट इंडीज)
हॅरी ब्रूकची (Harry Brook) नजर आता सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांचा विक्रम मोडण्याकडे आहे. पहिल्या 6 कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय कर्णधाराच्या नावावर आहे. गावसकर यांनी कसोटीच्या पहिल्या 6 सामन्यात 912 धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन हे 862 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. हे दोन्ही विक्रम मोडून नवा विश्वविक्रम रचण्याची ब्रुककडे मोठी संधी आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला. किवी गोलंदाजांनीही हा निर्णय जो रूट आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात उतरेपर्यंत योग्य ठरवला. वास्तविक, मॅट हेन्री आणि टीम साऊदी यांनी मिळून इंग्लिश संघाला सुरुवातीचे धक्के दिला. अवघ्या 21 धावांवर इंग्लंडने तीन विकेट गमावल्या. त्यानंतर रुट आणि ब्रूक यांनी मिळून संघाला अडचणीतून बाहेर काढले. शिवाय मोठ्या धावसंख्येचा मार्गही दाखवला. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत इंग्लंडने 65 षटकांत 3 विकेट गमावून 315 धावा केल्या आहेत. रुट 101 तर ब्रुक 184 धावांवर खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये चौथ्या विकेटसाठी 294 धावांची भागीदारी झाली. या मैदानावर चौथ्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.