Lok Sabha Election 2024 : स्वप्नवत कामगिरीसाठी भाजप सज्ज; गुजरातमध्ये खाते उघडण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

Lok Sabha Election 2024 : स्वप्नवत कामगिरीसाठी भाजप सज्ज; गुजरातमध्ये खाते उघडण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा स्वप्नवत कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2014 आणि त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपने या राज्यात सर्व 26 जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधी काँग्रेसला धोबीपछाड दिली होती. येथे 26 जागांसाठी एकाच टप्प्यात 7 मे रोजी मतदान होत आहे.

यावेळी भाजपने विकासाच्या मुद्द्याभोवती आपला सारा प्रचार केंद्रित केला आहे. विरोधकांनी शिक्षण, आरोग्य सुविधा, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे अजेंड्यावर घेतले आहेत. गुजरात राज्य म्हणजे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी भाजपने चारशे जागा मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्यामुळे गुजरातचे महत्त्व आपोआपच वाढले आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या दुसर्‍या यादीत पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून आपण कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे संकेत भाजपने दिले आहेत. गुजरातमधील एकूण 26 पैकी 15 लोकसभा जागांसाठी पक्षाने सुरुवातीला उमेदवार जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेतला, हे विशेष.
काँग्रेस-'आप' युतीने रंगत वाढवली

यावेळी पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांनी युती केली आहे. जागावाटपानुसार काँग्रेस 24 जागांवर लढणार असून भरुच व भावनगर या दोन जागा आम आदमी पक्षाला सुटल्या आहेत. आम आदमी पक्ष हळूहळू येथे आपले बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. विशेषतः सुरत महापालिकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळवून आपने प्रथमच आपल्या कामगिरीची दखल घेणे भाजपला भाग पाडले. याखेरीज अन्य छोटे प्रादेशिक पक्षही मैदानात उतरले आहेत. काँग्रेससाठी चिंतेची बाब म्हणजे 2014 आणि त्यानंतर 2019 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील या सर्वांत जुन्या पक्षाची पाटी कोरीच राहिली. त्या धक्क्यातून हा पक्ष किती सावरला, हे कळण्यास मार्ग नाही. 2009 मध्ये काँग्रेसला येथे 11 जागांवर विजय मिळला होता. तेव्हापासून हा पक्ष गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत आपले खाते उघडण्यासाठी धडपडत आहे.

काँग्रेस आणि 'आप' यांच्या युतीतील विरोधाभास म्हणजे 'आप'ने गुजरातमध्ये काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. मात्र, पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष परस्परांविरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. विभागवार विचार केला तर सौराष्ट्र आणि कच्छमध्ये एकूण आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. तेथे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवल्याचे दिसून येते. उत्तर गुजरातमध्ये गांधीनगरसह एकूण सात जागांचा समावेश आहे. मध्य गुजरातमध्ये वडोदरा आणि आदिवासी पट्ट्यातील दाहोड, पंचमहल आणि छोटा उदयपूर यासारख्या सहा मतदार संघांचा समावेश आहे. यावेळीही आदिवासी पट्ट्यातील मतांवर भाजपची मदार आहे. दक्षिण गुजरातमध्ये सुरत, भरुच आणि नवसारी यासह एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यातील सुरत महानगर डायमंड सिटी म्हणून जगप्रसिद्ध आहे. नवसारी येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 6.89 लाख मतांच्या फरकाने विक्रमी विजय मिळवला होता. यावेळी ते पुन्हा रिंगणात आहेत.

गांधीनगर, पोरबंदर प्रतिष्ठेचे मतदारसंघ

भाजपचा बालेकिल्ला म्हणून सर्वपरिचित असलेला गांधीनगर मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जातो. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या दिग्गजांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्री शहा गांधीनगरचे खासदार आहेत. त्यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सी. जे. चावडा यांचा 5.57 लाख मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला होता. यावेळी पुन्हा एकदा शहा याच मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. पोरबंदर हा आणखी एक प्रतिष्ठेचा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे पाटीदार समाजाचा वरचष्मा दिसून येतो. यावेळी भाजपने केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना येथून उमेदवारी दिली आहे. विद्यमान पंतप्रधान आणि त्यापूर्वी दशकाहून अधिक काळ या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या मोदी यांच्याबद्दल गुजराती लोकांमध्ये प्रचंड आदर आहे. त्यामुळे मोदी यांच्या करिष्म्याने लागोपाठ दोनदा भाजपने विरोधकांची दाणादाण उडवली. यावेळीही भाजप विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी उत्सुक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news