कोरेगाव भीमा, पुढारी वृत्तसेवा: तुळापूर (ता. शिरूर) येथील एका ठेकेदाराला जमीन व्यवहाराच्या वादातून तिघांनी दडवून आणि पिस्तूलाचा धाक दाखवून चाकूने मारहाण करत जखमी केले. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात गोपीचंद दत्तात्रय शिवले आणि आशुतोष लोखंडे या दोघांसह एका अनोळखी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळापूर येथील ठेकेदार संजय चव्हाण यांच्या मुलाच्या मोबाईलवर गोपीचंद शिवले याने फोन करून संजय यांच्याबाबत चौकशी केली. त्यानंतर संजय घरी आल्यानंतर मुलाने शिवलेचा फोन आल्याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी शिवलेला फोन केला. शिवले याने संजय यांना गावात बोलावून घेतले. तेथे गोपीचंद शिवले व आशुतोष लोखंडे या दोघांनी संजय यांना शिवीगाळ, दमदाटी करत तुला डॉ. ढगे यांना द्यायला पैसे आहेत, आम्हाला द्यायला नाही, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, शेजारील नागरिकांनी भांडणे सोडवली. त्या वेळी संजय यांनी आपण पोलिस ठाण्यात जाऊन वाद मिटवू असे म्हणत पोलीस ठाण्याकडे निघाले. पोलिस ठाण्यात जात असताना शिवले यांच्यासह दोघांनी संजय यांचा पाठलाग करत जय मल्हार हॉटेलसमोर त्यांची कार अडवली. तेथे गोपीचंद शिवले याने हातातील पिस्तूलचा धाक दाखवत संजय यांना खाली उतरवले आणि आशुतोष याने चाकूने त्यांच्या हातावर वार केला, तर कारमधून आलेल्या एका अनोळखी युवकानेदेखील संजय यांच्या दंडावर वार करून जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी गर्दी केल्याने मारहाण करणारे पळून गेले, तर काही नागरिकांनी जखमी संजय चव्हाण यांना उपचारासाठी वाघोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत संजय प्रभाकर चव्हाण (वय ४६, रा. तुळापूर, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली. त्याआधारे पोलिसांनी गोपीचंद शिवले आणि आशुतोष लोखंडे यांच्यासह एका अनोळखी युवकावर गुन्हे दाखल केले आहेत. तपास पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुहास पाटील करीत आहेत.