किशोर खुडे
पारगाव : पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतीत आधुनिक तंत्राचा वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. याचा प्रत्यय आंबेगाव तालुक्यातील जवळे गावात आला. मल्चिंग पेपरवर सेंद्रिय खते, औषधांचा वापर करून एका शेतकर्याने कांद्याचे विक्रमी उत्पादन मिळविले आहे. एक एकर क्षेत्रात तब्बल 550 पिशव्यांचे विक्रमी गळीत अंकुश रामचंद्र गायकवाड या शेतकर्याने मिळविले आहे.
जवळे येथील शेतकरी अंकुश रामचंद्र गायकवाड यांनी सात एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर यंदा कांदा लागवड केली होती.
हा आधुनिक प्रयोग करताना त्यांनी सेंद्रिय खते, औषधांचा वापर केला. मल्चिंग पेपरवर लागवड करणारे गायकवाड हे या परिसरातील पहिलेच शेतकरी ठरले होते. सध्या त्यांची कांदा काढणी सुरू आहे. एक एकर क्षेत्रात त्यांना तब्बल 550 कांदा पिशव्यांचे गळीत मिळाले आहे. गायकवाड यांनी पाटपाण्यावरील कांदा लागवडीला यंदा फाटा दिला. मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली. त्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय खते, औषधांचाच वापर केला. कांदा पिकासाठी पाणी, खते, औषधांचे व्यवस्थापन अंकुश गायकवाड यांचे बंधू मनेश गायकवाड यांनी केले.
कांदा भरतो वजनाला अधिक
मल्चिंग पेपरवर घेतलेल्या कांद्याची टिकाऊ क्षमता अधिक असते. त्यामुळे कांदा लवकर सडत नाही. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी वाहून जात नाही. यामुळे जमीन भुसभुशीत राहते. परिणामी, मुळांची वाढ चांगली होऊन व कांदा वजनाला अधिक भरतो.
मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केल्याने खुरपणीचा खर्च वाचला, प्रतिकारक किरणांमुळे कांदा पिकावर रसशोषक किडी रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे महागड्या औषधांच्या फवारणीचा खर्च वाचला. एक एकर क्षेत्रात सुमारे सव्वादोन लाख रोपांची लागवड केली होती. लागवड एकसमान झाल्यामुळे सध्या कांद्याचा आकार हा एकसमान व चांगल्या प्रतीचा राहिला आहे.
अंकुश गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी, जवळे