ENG vs SL : हसरंगा झुंजला पण, इंग्लंडने मारली मोक्याच्या क्षणी बाजी

ENG vs SL : हसरंगा झुंजला पण, इंग्लंडने मारली मोक्याच्या क्षणी बाजी
Published on
Updated on

ENG vs SL : इंग्लंडने जोस बटलरच्या नाबाद शतकी ( १०१ ) खेळीच्या जोरावर श्रीलंकेसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर श्रीलंकेला १३७ धावात गुंडाळात सामना ७ धावांनी जिंकला. इंग्लंडचा हा यंदाच्या टी २० वर्ल्डकपमधील सलग चौथा विजय आहे. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने २१ चेंडूत ३४ धावांची झुंजार खेळी केली मात्र इंग्लंडने मोक्याच्या क्षणी सामन्यावर पुन्हा नियंत्रण मिळवत सामना जिंकला.

इंग्लंडने ठेवलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात निसंका धावबाद झाला त्यानंतर आदिल रशीदने चरिथ असलंगाला २१ धावांवर बाद केले. यामुळे लंकेची अवस्था २ बाद २४ अशी झाली. राशिदने सेट होऊ पाहणाऱ्या अविष्का फर्नांडोलाही १३ धावांवर बाद करत लंकेची पॉवर प्लेमध्ये अवस्था ३ बाद ३४ अशी केली.

पॉवर प्लेनंतर भानुका राजपक्षे आणि वानिंदू हसरंगाने भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी मात्र ख्रिस वोक्सने राजपक्षेला २६ धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला. दरम्यान, हसरंगाने आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेला १७ व्या षटकात १२९ धावांपर्यंत पोहचवले. त्याने धावा आणि चेंडू यातील फरक कमी करण्यास सुरुवात केली.

मात्र लिव्हिंगस्टोनला मोठा फटका मारण्याचा हसरंगाचा प्रयत्न फसला आणि तो २१ चेंडूत ३४ धावा करुन बाद झाला. पाठोपाठ हसरंगाला साथ देणारा कर्णधार शनका देखील २५ चेंडूत २६ धावा करुन धावबाद झाला. यामुळे लंकेची धावगती मंदावली.  दरम्यान १२ चेंडूत ३० धावांची गरज असताना  दुश्मंता चमिरा देखील ४ धावांची भर घालून परतला.

त्यानंतर मोईन अलीने करुणारत्नला शुन्यावर तर महीश तीक्शानाला २ धावांवर बाद करत लंकेचा डाव १३७ धावात संपवला. इंग्लंडने सामना २६ धावांनी जिंकत सलग चौथा विजय साजरा केला. इंग्लंडकडून मोईन अली, आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

ENG vs SL : बटलर विरुद्ध लंकन गोलंदाज 

तत्पूर्वी, वर्ल्डकप २०२१ मध्ये आज श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने इंग्लंडला पॉवर प्लेमध्येच धक्के देण्यास सुरुवात केली. वानंदु हसरंगाने दुसऱ्याच षटकात जेसन रॉयला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जोस बटलरने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र चमिराने मलानला ६ धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला.

पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात हसरंगाने इंग्लंडला अजून एक मोठा धक्का दिला. त्याने जॉनी बेअरस्टोला भोपळाही न फोडू देता माघारी धाडले त्यामुळे इंग्लंडची पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३६ धावा अशी झाली. या पडझडीनंतर बटलर आणि कर्णधार मॉर्नगनने डाव सावरत ११ व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

दरम्यान, जोस बटलर अर्धशतकाजवळ पोहचला होता. या दोघांनी सावध फलंदाजी करत १५ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान दोघेही सेट झाल्याने त्यांनी अखेरच्या ५ षटकात तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बटलर यात आघाडीवर होता. दरम्यान, मॉर्गन १९ व्या षटकात ४० धावांवर बाद झाला. दुसऱ्या बाजूने षटकारांची आतशबाजी करणारा बटलर शंभरच्या जवळ पोहचला होता. त्याने २० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. याचबरोबर इंग्लंडलाही १६३ धावांपर्यंत पोहचवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news