नागपूर : पुढारी वृत्तसेवा : २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते, असे ते म्हणाले.
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर पंचायतच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नगर पंचायतमधील काही नगरसेवकांनी तीव्र विरोध करीत मंजूर ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या कॉंग्रेस नगरसेवकांवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. शिवसेनेचे आमदार मोदी यांचेच फोटो लावून निवडून आणले आहेत. युतीत असताना तोंडभरून कौतुक करीत होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर बसल्यावर एकेरी बोलू नये,महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
दरम्यान, लोकाधिकार अबाधित ठेवून रिफायनरी बारसू येथेच व्हावी यासाठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट पत्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला दिले होते. त्याचवेळी ठाकरे यांनी लोकसुनावणी घेतली असती तर त्यांना आता बोलता आले असते. बारसू प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर नेते याबाबत जनतेचे अधिकार अबाधित राखून योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
.हेही वाचा