नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मजूर संघाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये आमदार कोकाटे तसेच आमदार दराडे बंधू यांच्या गटाला, तर योगेश (मुन्ना) हिरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निवडणुकीत फेडरेशनवर वर्चस्व असलेले राजेंद्र भोसले प्रणीत आपलं पॅनलला तीन, केदा आहेर, संपतराव सकाळे प्रणीत सहकार पॅनलने दोन जागांवर विजय संपादन केला. तसेच माजी आमदार पराग वाजे, उदय सांगळे यांची सिन्नरमध्ये, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची येवल्यात, चांदवडमध्ये माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांची सरशी झाली आहे. नाशिक तालुक्यातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या योगेश (मुन्ना) हिरे यांचा विजयी रथ शर्मिला कुशारे यांनी रोखत 16 मतांनी पराभव केला.
जिल्हा मजूर संघाच्या संचालक पदाच्या २० जागांसाठी ही निवडणूक झाली. २० पैकी ८ संचालक बिनविरोध निवडले गेले. उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २५) ९६.७३ टक्के मतदान झाले होते. सोमवारी (दि. 26) सकाळी 8 पासून निवडणूक अधिकारी सुरेशगिरी महंत यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. चार टेबलांवर 7 तालुका संचालक व 5 जिल्हा संचालक पदासाठी एकत्रित मतमोजणी झाली. 11 वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होऊन निवडणूक अधिकारी महंत यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करत, त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले.
सिन्नर तालुका संचालक पदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आ. माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या दिनकर उगले या उमेदवाराचा पराभव आ. कोकाटे यांचे भाऊ भारत कोकाटे यांनी केला. भारत कोकाटे यांना माजी आमदार पराग वाजे यांचा पाठिंबा मिळाला होता. जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे बघितले जात होते. येवला तालुका संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी मंंत्री छगन भुजबळ यांनी पाठिंबा दिलेल्या सविता धनवटे यांनी विधानपरिषद सदस्य दराडे बंधूंनी पाठिंबा दिलेल्या मंदा बोडके यांचा पराभव केला. तसेच नाशिक सर्वसाधारण गट या प्रवर्गातून नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक योगेश हिरे यांचा पराभव झाला. त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचा पाठिंबा असलेल्या शर्मिला कुशारे यांचा विजय झाला.
इतर मागास प्रवर्गातून अर्जुन चुंभळे यांनी संदीप थेटे यांचा पराभव केला. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात शशिकांत उबाळे यांनी किरण निरभवणे यांचा पराभव केला. महिला राखीव गटात अर्ज केलेल्या तीन महिलांपैकी दोन महिला निवडल्या जाणार होत्या. त्यामध्ये दीप्ती पाटील आणि कविता शिंदे यांनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांंची मते घेतली, तर अनिता भामरे यांना सर्वांत कमी मते मिळाल्याने पराभवाचा सामना करावा लागला. विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून राजाभाऊ खेमनार यांचा विजय झाला. त्यांनी सुदर्शन सांगळे आणि आप्पासाहेब दराडे यांचा पराभव केला. पेठ तालुका संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुरेश भोये यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज धूम यांचा एक मताने पराभव केला. याच गटातून निवडणुकीला उभे असलेल्या भगवान पाडवी यांना एकमत देखील मिळालेले नाही. चांदवड तालुका संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवाजी कासव यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शरद आहेर यांचा पराभव केला. देवळा तालुका संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सतीश सोमवंशी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील देवरे आणि सुभाष गायकवाड यांचा पराभव केला. गायकवाड आणि देवरे यांना एकही मत मिळाले नाही. सुरगाणा तालुका संचालक पदाच्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी आनंदा चौधरी यांचा पराभव केला आहे.
प्रवर्ग विजयी उमेदवार (प्राप्त मते)
इतर मागास प्रवर्ग… अर्जुन चुंभळे (३८२)
विमुक्त जाती भटक्या जमाती… राजाभाऊ खेमनार (४११)
अनुसूचित जाती जमाती… शशिकांत उबाळे (४०४)
महिला राखीव… दीप्ती पाटील (७२६), कविता शिंदे (६४८)
नाशिक सर्वसाधारण… शर्मिला कुशारे (८५)
सिन्नर सर्वसाधारण… भारत कोकाटे (३२)
येवला सर्वसाधारण… सविता धनवटे (५४)
पेठ सर्वसाधारण… सुरेश भोये (६)
चांदवड सर्वसाधारण… शिवाजी कासव (३०)
देवळा सर्वसाधारण… सतीश सोमवंशी (४४)
सुरगाणा सर्वसाधारण… राजेंद्र गावित (१२)
मालेगाव सर्वसाधारण… राजेंद्र भोसले (बिनविरोध)
नांदगाव सर्वसाधारण… प्रमोद भाबड (बिनविरोध)
निफाड सर्वसाधारण… अमोल थोरे (बिनविरोध)
सटाणा सर्वसाधारण… शिवाजी रौंदळ (बिनविरोध)
दिंडोरी सर्वसाधारण… प्रमोद मुळाणे (बिनविरोध)
त्र्यंबकेश्वर सर्वसाधारण… संपत सकाळे (बिनविरोध)
कळवण सर्वसाधारण… रोहित पगार (बिनविरोध)
इगतपुरी सर्वसाधारण… ज्ञानेश्वर लहाने (बिनविरोध)