सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. आमच्या अनेकदा गप्पा होतात. मात्र, त्यांनी कधी ते बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते, असे कधी सांगितले नाही. जर ते तेथे गेले होते, तर कुठे उभे होते, त्यांना दगड वगैरे लागले का? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता का ? की ते तेथून पळून आले होते, याची माहिती त्यांनी मला सहज गप्पा मारता मारता द्यावी, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि.३) येथे पत्रकारांशी बोलताना केली.
फडणवीस यांनी बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडायला मी होतो, असा दावा केला आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझ्या अनेकदा गप्पा रंगल्या आहेत. मात्र, कधीतरी त्यांनी हे मला सांगायला हवे होते. ही काही छोटी गोष्ट नाही. त्यांनी ते सांगितले नाही म्हणजे ते खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट आहे. बाबरी पाडून किती वर्षे झाली? त्यांचे वय किती होते? ते २१-२२ वर्षांचे होते. तर मग लालकृष्ण अडवाणींनी या तरुणाला त्याच्या करिअरची चिंता न करता तिकडे कशाला नेले? या सगळ्या गप्पांना अर्थ नाही. त्यावेळीच बाबासाहेब ठाकरे यांनी त्या गोष्टीची जबाबदारी घेतली होती, असे पाटील यावेळी म्हणाले.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेत्यांना केंद्राकडून झटपट संरक्षण दिले जात आहे. त्याविषयी पाटील म्हणाले की, मला पोलीस संरक्षण घेण्याची वेळ कधी आली नाही. या लोकांना कदाचित अतिरेक्यांपासून धोका असण्याची शक्यता आहे. त्यांना दाऊदचा फोन आला असू शकतो किंवा त्याचे कुणाशी काही गंभीर बिनसलेले असू शकते, असा टोला पाटील यांनी लगावला.
हेही वाचलंत का ?