बाल हत्याकांड : सरकारच्या नाकर्तेपणामुळे टळला रेणुका, सीमाच्या फासाचा दोर..!

बाल हत्याकांड : सरकारच्या नाकर्तेपणामुळे टळला रेणुका, सीमाच्या फासाचा दोर..!
Published on
Updated on

कोल्हापूर; दिलीप भिसे : निष्पाप बालकांचे अपहरण, हत्याकांड घडवून क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या आणि अत्यंत निर्ढावलेल्या रेणुका शिंदे आणि सीमा गावीत या क्रूर बहिणींची फाशीची शिक्षा रद्द झाली असून त्यांना आता मरेपर्यंत कारावास भोगावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सोमवारी याचिकेवर निवाडा दिला. राष्ट्रपतींनी फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करूनही दोघींना फासावर लटकविण्यात शासन यंत्रणेला सपशेल अपयश आल्याचे या प्रकरणात स्पष्ट झाले आहे. ( बाल हत्याकांड )

प्रशासकीय निष्काळजीचा फायदा घेत चिमुकल्यांचा गळा घोटणार्‍या या क्रूरकर्म्यांनी फाशीची शिक्षा रद्द व्हावी, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ( बाल हत्याकांड )

जून 2001 मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. 9 सप्टेंबर 2002 रोजी उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केली. 31 ऑगस्ट 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केले. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने 18 जून 2014 रोजी याचिका फेटाळली. त्यानंतर 20 जुलै 2014 रोजी राष्ट्रपतींनी त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर 7 वर्षांच्या काळात शिक्षेची अंमलबजावणी करण्यात मात्र सरकारला अपयश आले. ( बाल हत्याकांड )

दया याचिकेवर निर्णय घेण्यास अन्यायकारक विलंब केल्याचा दावा करीत आपणाला प्रचंड मनःस्ताप झाला आणि जगण्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले आहे, असे रेणुका आणि सीमाने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे नमूद केले. न्या. जामदार, न्या. सारंग यांच्यासमोरील सुनावणीत सरकारी वकील अरुणा पै यांनी गुन्ह्यांची व्याप्ती, तीव—ता आणि क्रौर्य पाहता भगिनींना मृत्युदंडाहून कमी शिक्षा करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. ( बाल हत्याकांड )

1996 मध्ये कोल्हापुरात 14 बालकांचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी 5 जणांची हत्या केल्याप्रकरणी दोघींना अटक केली होती. मुख्य सूत्रधार आणि सीमा आणि रेणुका यांची आई अंजना गावित हिलाही याचवेळी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र, 17 डिसेंबर 1996 रोजी कारागृहातच तिचा मृत्यू झाला होता.

शिक्षेचा मार्ग मोकळा; पण..!

या खटल्यातील आरोपी रेणुका शिंदे, सीमा गावीत यांनी फाशीच्या शिक्षेतून सूट मिळावी म्हणून राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळल्यानंतर निर्ढावलेल्या भगिनींना फाशीची शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला होता; पण याची अंमलबजावणी झाली नाही.

…म्हणे मूलभूत हक्काचं उल्लंघन

सात वर्षांच्या काळात शिक्षेची अंमलबजावणी करण्यास सरकारला अपयश आल्याने दोघींनीही त्याचा फायदा घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 25 वर्षे आपण दोघीही कारावास भोगत आहोत. याकाळात आपल्याला प्रचंड मनःस्ताप झाला आहे. जगण्याच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्याचेही त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता.

माथेफिरू माय-लेकींकडून चिमुरड्यांचा बळी

मुख्य सूत्रधार अंजना गावितसह तिच्या दोन मुली गर्दीच्या ठिकाणी खिशातील पाकिटांसह हातोहात दागिने लंपास करण्यात पटाईत होत्या. गुन्हे करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले अथवा जमावाच्या हाती लागल्यास अपहरण केलेल्या बालकांना पुढे केले जात होते. निष्पाप बालकांना भिंतीवर आपटून, गंभीर जखमी करून माय-लेकी स्वत:ची सुटका करून घेत. माय-लेकींनी 1990 च्या दशकात अक्षरश: दहशत माजविली होती. कोल्हापुरात 14 बालकांचे अपहरण करून त्यापैकी 9 जणांची निघृण हत्या केली होती.

जावयाच्या कबुलीनंतर दुसर्‍याच दिवशी सासूचा मृत्यू

कोल्हापूर पोलिसांनी अंजना गावितसह दोन मुली रेणुका शिंदे, सीमा गावित आणि रेणुकाचा पती माणिक शिंदे अशा 5 जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. 3 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांना अटक झाली. 16 डिसेंबर 1996 त्यांचा न्यायालयात कबुली जबाब होताच दुसर्‍याच दिवशी म्हणजे 17 डिसेंबर 1996 मध्ये अंजनाचा मृत्यू झाला. जावई किरण शिंदे याने सासू, पत्नीसह मेहुणीच्या कारनाम्याची माहिती दिल्याने भांडाफोड झाला होता.

पोटापाण्यासाठी अंजनाने स्वीकारला चोरीचा मार्ग

अंजना गावितसह दोन्ही मुलींनी 1990 पासून बालकांचे अपहरण व त्यांच्या हत्याकांडाला सुरुवात केली. अंजना मूळची नाशिक येथील. तरुण ट्रक ड्रायव्हरशी तिचे सूत जमले. दोघांनी पुण्यात पळून जाऊन विवाह केला. त्यांना रेणुका ही मुलगी झाली. कालांतराने ट्रकचालक आणि अंजना याच्यात मतभेद झाले. त्याने अंजनाला सोडून दिले. परिस्थिती बिकट बनल्याने मोलमजुरी करून तिने रेणुकाचा सांभाळ केला. त्यानंतर अंजनाने निवृत्त जवान मोहन गावितशी विवाह केला. अंजनाला दुसरी मुलगी झाली. तिचे नाव सीमा गावीत.सीमाच्या जन्मानंतर काही दिवसांनी मोहनशी तिचा काडीमोड झाला. पोटापाण्यासाठी अंजनाने मुलींच्या मदतीने चोरीचा उद्योग निवडला.

चुकांचं प्रायश्चित कोण घेणार? : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

बालक अपहरण, हत्यांच्या घटना क्रूर, माणुसकीला काळिमा फासणार्‍या आहेत. फाशीची शिक्षा अपवादात्मक गुन्ह्यात दिली जाते. भविष्यात गंभीर गुन्हे घडू नयेत. कायद्याचा वचक राहावा, हा उद्देश असतो. अंजना गावितसह मुलींची कृत्ये शहारे आणणारी होती. राष्ट्रपतींकडून फाशीवर शिक्कामोर्तब होऊनही मुदतीत अंमलबजावणी न होणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. या प्रकरणात झालेल्या चुकांचं कोण प्रायश्चित घेणार, असाही सवाल निकम यांनी केला.

घटनाक्रम

  • ऑगस्ट 1990 : चिमुरड्या संतोषचे कोल्हापूर बसस्थानक येथून अपहरण
  • 14 एप्रिल 1991 : संतोषचा कोल्हापूर बसस्थानक आवारात खून
  • मार्च 1992 : नरेशचे अपहरण
  • एप्रिल 1993 : स्वाती, बंटीचे अपहरण
  • मे 1993 : सचिन, गुड्डू, मोनाचे अपहरण
  • 30 जून 1993 : बंटीचा खून
  • 18 ऑक्टोबर 1994 : अंजली ऊर्फ पिंकीचे अपहरण
  • 23 जुलै 1995 : पिंकीचा मृतदेह मिळाला
  • 6 मार्च 1995 : राजा ऊर्फ स्वप्निल घोडगिरीचे अपहरण
  • मार्च 1995 : राजा ऊर्फ स्वप्निल घोडगिरीचा खून
  • 23 एप्रिल 1995 : भाग्यश्री ऊर्फ श्रद्धाचे अपहरण
  • 19 ऑगस्ट 1995 : क्रांतीचे अपहरण
  • 6 डिसेंबर 1995 : क्रांतीचा खून
  • 3 जानेवारी 1996 : गौरीचे अपहरण
  • 12 एप्रिल 1996 : गौरीचा खून
  • 17 जुलै 1996 : पंकजचे अपहरण
  • 11 सप्टेंबर 1996 : पंकजचा खून
  • 22 ऑक्टोबर 1996 : रेणुका, सीमाला अटक
  • 29 ऑक्टोबर 1996 : अंजनाबाई गावीतला अटक
  • 3 नोव्हेंबर 1996 : जावई किरण शिंदेला अटक
  • 16 डिसेंबर 1996 : किरण शिंदेचा कबुली जबाब
  • 17 डिसेंबर 1996 : सूत्रधार अंजनाबाईचे निधन
  • 30 मे 1997 : किरण शिंदे : माफीच्या साक्षीदारासाठी कोर्टात अर्ज
  • 17 सप्टेंबर 1998 : बाल हत्याकांड खटल्याच्या सुनावणीला सुरुवात
  • 22 जून 2001 : गावित भगिनींना फाशीची शिक्षा ठोठावली
  • 9 सप्टेंबर 2002 : उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा कायम
  • 31 ऑगस्ट 2006 : सुप्रिम कोर्टात फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब
  • 18 जून 2014 : गृह मंत्रालयाने दयेची याचिका फेटाळली
  • 20 जुलै 2014 : राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला
  • जुलै 2014 : फाशी टाळण्यासाठी हायकोर्टात याचिका
  • नोव्हेंबर 2021 : हायकोर्टातील सुनावणी पूर्ण
  • 18 जानेवारी 2022 : फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news