Lok Sabha 2024 : काँग्रेसला हव्या आहेत जास्तीत जास्त जागा!

Lok Sabha 2024 : काँग्रेसला हव्या आहेत जास्तीत जास्त जागा!
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) महाराष्ट्रातील वाटाघाटींची जुनी समीकरणे गैरलागू ठरली आहेत. वर्तमान परिस्थितीनुसार आणि मेरिटनुसारच महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटप व्हावे, या पवित्र्यात काँग्रेस पक्ष असल्याचे समजते. तसेच जास्तीत जास्त जागा लढविण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न राहील, असे सूत्रांचे म्हणणे होते.

दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय जागावाटप समितीसोबत प्रदेश काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली. काँग्रेसने जास्तीत जास्त जागा कशा लढवाव्यात यावर सादरीकरण झाले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य संघटना या पक्षांसोबतच्या संभाव्य वाटाघाटींवरही चर्चा झाल्याचे कळते.

इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत जागावाटपाच्या चर्चेसाठी नेमलेल्या अशोक गेहलोत समितीसोबत शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची व्यापक चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याशी होणारे संभाव्य जागावाटप हा मुद्दा केंद्रस्थानी होता. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

जास्तीत जास्त जागा लढवण्यावर आग्रही (Lok Sabha 2024)

महाराष्ट्रात काँग्रेसने कशी निवडणूक लढवायची याचे सादरीकरण समितीसमोर झाले. त्यात महाराष्ट्रातील किती जागा काँग्रेसने लढवायच्या याचा आकडा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली आहे. त्यामुळे जिंकलेली जागा किंवा दुसर्‍या क्रमांकाची मिळालेली मते या आधारे जागांवर दावा करणे हे सूत्र लागू होऊ शकत नाही. यावरही बैठकीत चर्चा झाली.

या दोन्ही पक्षांशी वाटाघाटी करताना नेमकी ताकद आणि उमेदवार कोण यावर काँग्रेस ठाम राहील.वाटाघाटींमध्ये काँग्रेस पक्ष 25 पेक्षा अधिक जागांवर दावा करू शकतो, असे समजते.

इतर पक्षांशी चर्चा करण्याबाबत मंथन

सूत्रांच्या म्हणण्यानुसार बैठकीत धोरणात्मक मुद्द्यांवर बातचीत झाली आहे. राज्यातील विद्यमान राजकीय स्थिती आणि आमदार अपात्रता प्रकरणात 10 जानेवारीला निकाल आल्यानंतर भाजपकडून काय केले जाऊ शकते यावर चर्चा झाली. तसेच राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष या पक्षांशी कोणी चर्चा करावी यावरही विचारमंथन झाले. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेबाबत काँग्रेसमध्ये अजूनही साशंकता असल्याचेही सूत्रांनी सांगितले; तर अन्य पक्षांनी आघाडीमध्ये न येता सोबत राहण्याचे म्हटले आहे. त्यावरही मंथन झाले.

काँग्रेसच्या जे पोटात, ते ओठावर आले : वंचित

मुंबई : काँग्रेसच्या जे पोटात होते, ते आता ओठावर आले आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडियामध्ये वंचितला घ्यायचे किंवा नाही याबाबत देखावा करण्यापेक्षा एकदाचा काय तो निर्णय घेऊन जनतेला खरे सांगून टाकावे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी काँग्रेसला ठणकावले.

वंचितला सोबत न घेण्याची भूमिका काँग्रेसने आधीच ठरविली असल्याचे दिसून येते. त्यांच्या पोटात होते तेच आता त्यांच्या ओठावर आले आहे. एकत्र येण्याबाबत आम्ही पत्राद्वारे आमचा मनोदय व्यक्त केला आहे. मात्र, काँग्रेसने आधीपासूनच वंचित बहुजन आघाडीला वगळण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे आमच्या एकाही प्रयत्नाला काँग्रेसने प्रतिसाद दिलेला नाही, हे यावरून दिसून येते. त्यामुळे देखावा करण्यापेक्षा काँग्रेसने महाराष्ट्राच्या जनतेला खरे काय ते सांगून टाकावे, असे थेट आव्हान वंचितचे प्रवक्ते तथा प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news