पणजी; पुढारी वृत्तसेवा: गोवा म्हणजे फक्त सूर्य, वाळू आणि समुद्र नाही; परंतु हे हिंटरलँड पर्यटन, निसर्ग पर्यटन आणि धार्मिक पर्यटनासाठीही ओळखले जाते. गोव्यातील पर्यटन उपक्रमांना, सर्व प्रकारच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ' मालाबार ट्री निम्फ ' ला गोव्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले.
गोवा वन खात्यातर्फे दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित पाचव्या गोवा पक्षी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ( मालाबार ट्री निम्फ )
डॉ. सावंत म्हणाले की, पक्षी महोत्सवात भारतातील सोळा प्रतिनिधी आणि परदेशातील चार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. प्रत्येकाला गोव्याबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी गोवा सरकार नेहमी राज्याविषयी माहिती पुरविते आणि प्रसारित करते. चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य येथे दोन दिवसीय गोव्यातील पाचव्या पक्षी महोत्सवाचे आयोजन केले आहे. सर्व सहभागींना पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहण्याची संधी मिळेल.
या उद्घाटन प्रसंगी प्रधान मुख्य वन संरक्षक यांचे स्वागतपर भाषण झाले. राज्य फुलपाखरावरील लघुपटही यावेळी दाखविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोवा बर्ड कॉन्झर्व्हेशन नेटवर्कचे मंदार भगत यांचा सत्कार केला. मुख्य सचिव परिमल राय, वित्त खात्याचे प्रधान सचिव पुनीत कुमार गोयल, मुख्य वन्यजीव वॉर्डन संतोष कुमार, आयएफएस, प्रधान मुख्य वनसंरक्षक पंकज अस्थानन उपस्थित होते.
हेही वाचलंत का?