केरळमध्ये भाजपचे संघटन अजून मजबूत नसल्याने काही जागांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती पक्षाने आखली असून, ती यशस्वी ठरण्याची शक्यता दिसते. पक्षाने गेल्या काही वर्षांत अनेक प्रमुख नोकरशहा, अभिनेते आणि खेळाडूंना जोडले आहे, ज्यांनी मतांची टक्केवारी वाढविण्यात मदत केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये ख्रिश्चन धर्मियांना सोबत घेऊन भाजप डाव्यांचे आणि काँग्रेसचे अंदाज चुकवणार का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
कर्नाटक आणि तेलंगणामधील गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय आणि हिंदी हार्टलँड राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तथाकथित 'उत्तर-दक्षिण राजकीय विभाजन' होण्याची चर्चा सुरू झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप दक्षिणेचा राजकीय पासवर्ड डीकोड करू शकेल, की विंध्याचलच्या पलीकडच्या जमिनी भाजपचा अश्वमेध रोखत राहतील, याकडे सर्वच राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दक्षिणेकडील राज्यांत लोकसभेच्या 130 जागा आहेत. यामध्ये तामिळनाडूत 39, कर्नाटकात 28, आंध्र प्रदेशात 25, तेलंगणामध्ये 17, पुदुच्चेरीमध्ये एक आणि केरळमध्ये 20 जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केरळमध्ये 15 जागा जिंकल्या होत्या; तर तामिळनाडूत 8, तेलंगणामध्ये 3, कर्नाटक व पुदुच्चेरीत एक जागा जिंकली होती. दुसरीकडे भाजपने कर्नाटकातील लोकसभेच्या 25 जागा आणि तेलंगणातील चार जागांवर विजय मिळवला होता. भाजपच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांत काँग्रेसला स्वीकारार्हता आहे, हे इतिहासात दिसून येते. ही परंपरा काँग्रेसच्या वाईट काळातही चालू राहिली. उत्तरेकडील राज्ये आणि इतर भागांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सरकारला विरोध केला, तेव्हाही दक्षिणेकडील राज्यांत काँग्रेस टिकून राहिली. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नीचांकी पातळीवर पोहोचलेली असतानाही दक्षिणेत पक्षाची फारशी पडझड झाली नाही. वर्तमान स्थितीत कर्नाटक आणि तेलंगणामधील विजयाने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा आणि आशा दिली आहे.
भाजपचा विचार करता दक्षिणेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे नेटवर्क असूनही, लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेचे तळागाळातील काम होऊनही, वाजपेयी सरकारची मोहिनी आणि दोन वेळा देशभरात मोदी लाट येऊनही दक्षिणेतील बहुतांश राज्यात भाजपला पाय रोवता आले नाहीत. पण गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने दक्षिणेकडील राज्यांकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात अधिकाधिक जागा जिंकण्यावर भाजपचा भर आहे. यामध्ये तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळमधून भाजपला मोठ्या आशा आहेत. केरळमध्ये आतापर्यंत भाजपने लोकसभेची एकही जागा जिंकलेली नाही. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिशूरमध्ये रोड शो केला आणि त्यानंतर महिलांच्या मोठ्या रॅलीत भाग घेतला. या रॅलीद्वारे भाजपने केरळमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे.
केरळमध्ये भाजपचे संघटन अजून मजबूत नाही. म्हणून भाजपने मूठभर जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्रिशूर हे असे एक क्षेत्र आहे, जिथे डावे पक्ष आणि काँग्रेसच्या विरोधात भाजप आपली शक्यता पडताळून पहात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी यांना या मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्यांना 28.2 टक्के मते मिळाली होती. माजी राज्यसभा खासदार असणारे गोपी हे यंदाच्या लोकसभेमध्येही त्रिशूरमधून उमेदवार असतील, असे संकेत भाजपने दिले आहेत. पंतप्रधान मोदींसोबत त्यांच्या रोड शोमध्ये गेलेल्या गोपींना ख्रिश्चन समुदायाचे मतदान लाभेल, अशी भाजपला आशा आहे. तिरुअनंतपूरम ही दुसरी संसदीय जागा जिथे भाजप आपल्या शक्यतांची चाचपणी करत आहे. या मतदार संघातून काँग्रेसचे शशी थरूर सातत्याने विजयी होत आहेत. तिरुअनंतपूरम ही भाजपसाठी आशेचा किरण आहे. कारण केरळमधील लोकसभेच्या 20 जागांपैकी ही एकमेव जागा आहे, जिथे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजप दुसर्या क्रमांकावर आहे.
2014 मध्ये भाजपची येथे सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. त्यावेळी पक्षाचे केरळमधील ज्येष्ठ नेते ओ. राजगोपाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना 32.32 टक्के मते मिळाली आणि शशी थरूर यांना 34.09 टक्के मते मिळाली. 2009 च्या निवडणुकीच्या तुलनेत राजगोपाल यांना मिळालेल्या मतांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. राजगोपाल हे केरळमधील लोकप्रिय नेते आहेत. विशेष म्हणजे, संघ परिवाराच्या वर्तुळाबाहेरून मते मिळवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. या भागात हिंदू व्होटबँक आहे आणि भाजपकडे इतर क्षेत्रांपेक्षा तळागाळातील केडर चांगले आहेत. 2019 मध्ये या मतदार संघातून भाजपचे कुम्मनम राजशेखरन यांनीदेखील 31 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविली होती; पण तेव्हाही 41 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविणार्या शशी थरूर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
सबरीमालाच्या निषेधामुळे मध्य केरळमधील पठाणमथिट्टा ही 2019 मध्ये भाजपने लक्ष केंद्रित केलेली लोकसभेची आणखी एक जागा आहे. 2009 पासून काँग्रेसचे अँटो अँटोनी या जागेवर विजयी होत आहेत. 2019 मध्ये भाजपने आपले प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना या मतदार संघातून उमेदवारी दिली होती; पण त्यांना तिसर्या स्थानावर राहावे लागले. पठाणमथिट्टामध्ये सुमारे 35 टक्के ख्रिश्चन मतदार आहेत, ज्यापैकी मोठ्या संख्येने गैर-कॅथलिक आहेत, तर 58 टक्के मतदार हिंदू आहेत. यापैकी 20 टक्के हिंदू हे नायर समुदायाचे आहेत. येथील ख्रिश्चनांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप रणनीती आखणार आहे. ख्रिश्चनांनी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसपेक्षा सीपीआयएमला मतदान केल्यामुळे 2021 मध्ये पठाणमथिट्टा लोकसभा मतदार संघांतर्गत असणार्या सर्व सात विधानसभा मतदार संघात डाव्यांना विजय मिळवता आला. डाव्यांचे वर्चस्व असलेल्या तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील अटिंगल जागेवरही भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
2019 मध्ये काँग्रेसचे अदूर प्रकाश यांनी डाव्यांकडून ही जागा हिसकावून घेतली. केरळमधील भाजपचा महिला चेहरा म्हणून ओळखल्या जाणार्या शोभा सुरेंद्रन यांनी 2019 मध्ये अटिंगलमधून निवडणूक लढवली आणि 24.18 टक्के मते मिळवली होती. सबरीमाला प्रकरणावरून सीपीआय(एम) विरुद्ध हिंदूंच्या नाराजीला भाजपच्या मजबूत कामगिरीचे श्रेय देण्यात आले. यावेळीही भाजप मागासलेल्या एझावा समाजातील एका प्रमुख नेत्याला उमेदवारी देऊ शकते. केरळमध्ये भाजपने गेल्या काही वर्षांत अनेक प्रमुख नोकरशहा, अभिनेते आणि खेळाडूंना जोडले असून, त्यांच्या आधारे मतांची टक्केवारी वाढण्यास मदत झाली आहे. भाजपचा मित्रपक्ष असणार्या धर्म जनसेनेचे नेतृत्व एझवा समुदाय करत आहे. हा समुदाय परंपरेने सीपीआय(एम) सोबत राहिला आहे.
वर्षानुवर्षांपासून केरळमध्ये राजकारण द्विध्रुवीय राहिले आहे. कम्युनिस्ट पक्षांच्या नेतृत्वाखालील 'एलडीएफ' आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ' या दोन ध्रुवांमध्ये भाजप आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पक्षाचे पारंपरिक समर्थक असलेल्या 44 टक्क्यांहून अधिक मुस्लिम-ख्रिश्चन वर्गाकडून भक्कम पाठिंबा मिळण्याची आशा आहे. तथापि, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ'ला मोठा धक्का देण्यासाठी मुस्लिम-ख्रिश्चन मतदारांच्या मोठ्या वर्गाने डाव्यांच्या 'एलडीएफ'ला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच केरळ प्रदेश काँग्रेसने आपल्या हायकमांडला अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू नये, अशी विनंती केली होती आणि सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी ती मान्य केली आहे.
पिनाराई विजयन सरकारच्या दुसर्या कार्यकाळात निर्माण झालेल्या वादांचा फायदा होईल अशी आशा असली, तरी मुस्लिम मतदार कायम ठेवण्यासाठी 'एलडीएफ' सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत हिंदू-ख्रिश्चन वर्गाला आकर्षित करण्याचे भाजपचे प्रयत्न केरळमध्ये लोकसभेच्या काही जागा मिळवू शकतील का, हेही या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. राहुल गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपला विशेष स्वारस्य आहे. मागील काळात अमेठीची जागा राहुल यांना पराभूत करून भाजपने जिंकली होती. येत्या निवडणुकीत राहुल गांधी यांना वायनाडमध्ये रोखण्यासाठीही भाजपने जोर लावला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये केरळची लढाई अधिक रंजक ठरेल, असे दिसत आहे. साक्षरतेत अव्वल असणार्या या राज्यात भाजप किती प्रमाणात यशस्वी होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.