पुढारी ऑनलाईन: अब्दू रोझिक या ताजिकिस्तानच्या गायकाने बिग बॉस १६ मधून मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. बिग बॉस 16 विजेतेपदाचा दावेदार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात होते. मात्र, त्याच्या व्यावसायिक कामामुळे स्वेच्छेने तो या स्पर्धेतून बाहेर पडला. बिग बॉसमधील त्याचा जवळचा मित्र साजिद खान आणि तो एकाच आठवड्यात घराबाहेर पडले. मात्र. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर अब्दू रोझिक त्याच्या भारतीय चाहत्यांच्या भेटीगाठी घेत असून विविध कार्यक्रमाला तो हजेरी लावत आहे.
नुकतेच अब्दू रोझिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर पुण्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा पुणेरी अंदाज पाहायला मिळत आहे. पुणे शहरात आल्यानंतर पुणेरी पगडी आणि शाल देऊन अब्दूचे स्वागत करण्यात आले. या पुणेरी पेहरावात अब्दू फारच शोभून आणि गोड दिसत आहे. अब्दू याने ही पुण्याविषयी प्रेमही आपल्या पोस्टमधून व्यक्त केले. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत 'I Love Pune' असेही म्हटले आहे.
अब्दू रोझिकने हा फोटो शेअर करत 'पुणे' असे कॅप्शन देत त्यापुढे हार्ट इमोजीही पोस्ट केले आहे. भारतात 'छोटा भाईजान' म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या अब्दूचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याचा पुणेरी पेहराव चाहत्यांच्या पसंतीस पडत असून तो यामध्ये खूप क्युट दिसत असल्याच्या कमेंट्स चाहते करत आहेत.
दरम्यान अब्दूने पुणे शहरातील गोल्डन बॉइज यांचीही भेट घेतली. सनी वाघचौरे आणि संजय गुजर या दोघां सोबतचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तर तो काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचे संकेतही यावेळी त्याने दिले.
सध्या तो त्याचे लेटेस्ट गाणे 'प्यार' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बिग बॉस १६ मधून पडल्यानंतर त्याने त्याचे हिंदी गाणे 'प्यार' रीलिज केले आहे. युट्यूबवर या गाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे. या गाण्याने रीलिजनंतर अवघ्या सात दिवसामध्ये ८.५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळवले असून गाणे ट्रेंडिंगमध्येही आहे.