नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुवाहाटी दौऱ्यानंतर पंधरा दिवस 'किती खोके घेतले' असे संदेश यायचे. या संदेशामुळे घरातून बाहेर निघावे की, नाही असा विचार मनात चालू होता. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुवाहटीचा निरोप आला, त्यावेळी मी त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची मागणी करत ते देणार असेल तर मी येतो, असे गुपित दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मंगळवारी (दि.५) उघड केले. दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही कडू यांनी दिली.
त्र्यंबक राेडवरील ठक्कर डोम येथे मंगळवारी (दि.५) आयोजित दिव्यांग कल्याण विभागाच्या 'दिव्यांगाच्या दारी' या कार्यक्रमाप्रसंगी कडू बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील आदी उपस्थित होते.
कडू म्हणाले, दिव्यांगांच्या प्रश्नांवर वर्षांनुवर्षापासून लढा देत आहे. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करून दिलेला शब्द पूर्ण केला. दिव्यांगांच्या हितासाठी निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे जगातील व देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय राज्य शासनाने स्थापन केले आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा असल्याचे कडू म्हणाले. दिव्यांगांना काय हवे काय नको ते जाणून घेण्यासाठी राज्यभरात या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्ह्यात जाऊन दिव्यांगांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्नशील राहणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस दिव्यांगांसाठी दिल्यास त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजनांची जनजागृती होईल. अंत्योदय योजनेतून निश्चित केलेल्या लक्षांकाव्यतिरिक्त उर्वरित पाच टक्के धान्यसाठा दिव्यांगांना प्राप्त होण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेत लाभ दिला जाईल, असे कडू यांनी सांगितले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालेगावमध्ये दिव्यांग भवन
मालेगाव येथे दिव्यांग भवन उभारण्यात येणार आहे. या भवनासाठी ५० लाखांचा धनादेश तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या चावीचे वितरण बच्च कडू व मालेगाव मनपा आयुक्त गोसावी यांच्या हस्ते मुदतशीर हुसैन शबीर अहमद यांना करण्यात आले.
– जिल्हाभरातून दहा हजार दिव्यांगांची उपस्थिती
– कार्यक्रमस्थळी विविध विभागांचे ४० स्टॉल्स
– दिव्यांग बांधवांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
– मान्यवरांच्या हस्ते लाभार्थींना कर्जयोजना धनादेशवाटप
– ७५ बसेसद्वारे जिल्ह्यातून लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणले
हेही वाचा :