उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बोरीभडक फाट्यावर पुण्याकडून येणार्या चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला, तर भाऊ जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 30) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे. वैशाली नितीन शेंडगे (वय 28, रा. नायगाव, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.
या प्रकरणी मृत महिला वैशाली शेंडगे यांचा भाऊ विलास विश्वनाथ कोपनर यांनी यवत पोलिस ठाण्यात वाहनचालक यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी वाहनचालक मोहन रावसाहेब डोंबे (रा. खोर डोंबेवाडी, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली शेंडगे व विलास कोपनर हे बहीण-भाऊ आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त वैशाली शेंडगे या बंधू विलास यांच्याबरोबर दुचाकीवरून बोरीभडक या ठिकाणी बुधवारी (दि. 30) निघाल्या होत्या. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बोरीभडक फाट्यावर सोलापूरकडे जाणार्या चारचाकीने पाठीमागून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या वेळी वैशाली शेंडगे यांना जबरदस्त मार लागला.
उपस्थित नागरिकांनी त्यांना उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच वैशाली यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर विलास यांनादेखील दुखापत झालेली आहे. राखी बांधायला आलेल्या बहिणीवर काळाने घाला घातल्याने कोपनर परिवारासह बोरीभडक पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :