‘या’ ८ क्रिकेटपटूंवर झाले बलात्काराचे आरोप, भारताच्या तिघांचा समावेश - पुढारी

‘या’ ८ क्रिकेटपटूंवर झाले बलात्काराचे आरोप, भारताच्या तिघांचा समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटचे वादांशी खूप जुने नाते आहे. अलीकडे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याही एका नव्या वादात अडकताना दिसला. टीम इंडियाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूवर दाऊद इब्राहिमचा हस्तक रिवाज भाटीच्या पत्नीने बलात्काराचा आरोप केला. महिलेने तिच्या तक्रारीत हार्दिक पांड्यासोबत माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलचे नावही घेतले. या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या क्रिकेटपटूंवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत.

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नव्या अडचणीत सापडला आहे. दाऊद इब्राहिमचा हस्तक रियाझ भाटीच्या पत्नीने तिच्या पतीवर हायप्रोफाईल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. त्या हायप्रोफाईलमध्ये हार्दिक पंड्याचे नाव देखील समाविष्ट आहे. मुंबई पोलिसांसमोर दाखल करण्यात आलेल्या अर्जात क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचेही नाव आहे. वृत्तानुसार, रियाझ भाटीच्या पत्नीने २४ सप्टेंबर रोजी मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती.

मुनाफ पटेल…

रियाझ भाटीच्या पत्नीने गोलंदाज मुनाफ पटेलयाचेही नाव घेतले असून त्याच्यावरही बलात्काराचा आरोप केला. या महिलेने तिच्या अर्जात हार्दिक पांड्यासह मुनाफ पटेलचे नाव दिले आहे. या खेळाडूसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्या पतीने तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप महिलेने केला आहे.

अमित मिश्रा

भारताचा माजी लेगस्पिनर अमित मिश्रावर २०१५ मध्ये एका महिला जोडीदारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर अमित मिश्राला बेंगळुरू पोलिसांनी अटकही केली होती, मात्र काही तासांनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. अमित मिश्राविरुद्ध महिलेचा शारीरिक छळ आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ल्यूक पोम्सबँक

मे 2012 मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पोमर्सबँक याला नवी दिल्लीतील हॉटेलमध्ये एका महिलेचा शारिरीक छळ आणि तिच्या होणा-या पतीवर हल्ला केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोमर्सबँकची जामिनावर सुटका करण्यात आली. परंतु त्याला त्याचा पासपोर्ट जमा करावा लागला होता. प्रकरण न्यायालयाबाहेर निकाली निघाल्यानंतर त्याच्यावरील आरोप वगळण्यात आले.

मखाया एंटिनी

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मखाया एंटिनी याच्यावर 1999 च्या सुरुवातीला बलात्काराचा आरोप झाला. एंटिनीवर २२ वर्षीय विद्यार्थिनीने टॉयलेटमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर द. आफ्रिकेच्या या पहिल्या कृष्णवर्णीय क्रिकेटला दोषी मानले गेले होते, पण एंटिनीने आपले निर्दोषत्व सिद्ध केले आणि अखेरीस या प्रकरणात स्वत:ची निर्दोष मुक्तता करून घेतली.

रुबेल हुसेन

२०१५ मध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनवर त्याच्या मैत्रिणीने बलात्काराचा आरोप केला होता. महिलेने क्रिकेटरला तिच्याशी लग्न कर अशी मागणी केली होती पण, क्रिकेटरने नकार दिला. यानंतर पीडितेने रुबेलवर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. ऑस्ट्रेलियात २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकापूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली होती.

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर २००५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूनेच याचा खुलासा केला आहे. लाइव्ह चॅटमध्ये त्यांनी ही माहिती दिली. अख्तरच्या म्हणण्यानुसार, एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला संघाने दौऱ्यातून परत पाठवले होते, पण हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

रायन हिंड्स

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू रायन हिंड्सवर २०१२ मध्ये एका २८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. परंतु बार्बाडोस येथील न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तथापि, हिंड्सला आपला पासपोर्ट जमा करावा लागला आणि जामिनाची आणखी एक अट म्हणून आठवड्यातून एकदा हॉलटाउन पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागली.

Back to top button