मुंबईत शिवसेनेनं उपपंतप्रधानांची गाडी अडवली होती! | पुढारी

मुंबईत शिवसेनेनं उपपंतप्रधानांची गाडी अडवली होती!

पुढारी ऑनलाईन डेस्क : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा होता. या दौऱ्यात सुरक्षेसंदर्भात चुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. पंजाबमध्ये आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावरच अडकले होते. यावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने काँग्रेसवर आरोप सुरु केलेत.

देशात आता वादंग सुरु आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली असून सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठासमोर सदर प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत अशा प्रकारची चूक स्वीकारली जाऊ शकत नाही, असे सांगतानाच दोषी लोकांवर कठोर कारवाई करावी आणि पंजाब सरकारला आवश्यक ते निर्देश दिले जावेत, अशी विनंती अॅड. सिंग यांनी याचिकेत केली आहे. पंतप्रधानांची गाडी अडवणे हा प्रकार देशात पहिल्यांदा झालेला नाही. मुंबईत शिवसेनेनं उपपंतप्रधानांची गाडी अडवली होती.

ही घटना आहे वर्ष १९६९ ची

७ फेब्रुवारी १९६९ चा दिवस होता. भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबई दौऱ्यावर येणार होते. मराठी माणसांत मोरारजी देसाई संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून बदनाम होते. त्यांच्या विषयी मराठी माणसांत राग होता. त्यावेळी बेळगाव सीमावाद पेटला होता. त्यावेळी शिवसेनेनं उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांना मुंबईत येवू द्यायचं नाही अशी भूमिका घेतली होती.

शिवसेनेचा विरोध डावलून मोरारजी देसाई मुंबईत आले. उपपंतप्रधानांच्या गाडीचा ताफा माहीम कॉलेज जवळ आला होता. यावेळी शिवसेनेनं त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी मोरारजी देसाई यांच्या गाडीच्या ड्राईव्हरने यातून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात काही शिवसैनिक जखमी झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी दादर भागात दगडफेक केली होता.

या घटनेनंतर शिवसेना देशात पोहचली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी (PM’s security breach) आढळल्याचे बुधवारी पंजाबमधील एका घटनेने स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांची फिरोजपूर येथील नियोजित जाहीर सभा रद्द करण्याचा प्रसंग बुधवारी ओढविला होता. पंजाबातील शेतकरी संघटनांशी संबंधित निदर्शकांनी पंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा अडविला होता. त्यानंतरही पंजाब पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर अर्धा तास खोळंबला. या प्रकारावर पंतप्रधान मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे या गंभीर प्रकाराबद्दल खुलासा मागितला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button