सांगली जिल्ह्यात निर्बंध ‘जैसे थे’ ! | पुढारी

सांगली जिल्ह्यात निर्बंध ‘जैसे थे’ !

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात निर्बंध जैसे थे आहेत. जिल्ह्यातील संसर्ग दर 10 टक्क्यांच्या घरात गेल्याने जिल्ह्यात 19 जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु; संसर्ग दरात अद्याप तरी घसरण झाली नसल्याने निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात येणार आहेत.

मात्र, काही प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येते का, याबबतीत पालकमंत्र्यांची सोमवारी (दि.19) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी रविवारी सांगितले.

जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु; जिल्ह्याचा संसर्ग दर कमी होत नसल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी 14 जुलैपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 19 जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते.

परंतु; अद्यापतरी कोरोना संसर्ग दर कमी न झाल्याने सध्यातरी निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात काही घटकांना शिथिलता देण्यात येईल का, याबाबत प्रशासन पातळीवर चर्चा करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत लागू करण्यात आलेले निर्बंध जैसे थे ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. कोरोना संसर्ग दर अद्याप 10 टक्क्यांच्या वर असल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रशासनाला सूचना दिल्या.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन महिन्यापासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु तरी देखील कोरोना संसर्ग दर कमी होत नाही. त्यामुळे बाजार पेठा बंद आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग देखील हतबल आहे. बाजार पेठा सुरू करण्यासाठी हालचाली करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना सूचवाव्यात असे सांगितले.

174 गावांमध्ये कडक निर्बंध!

जादा रुग्णसंख्या असलेल्या 174 गावांत लॉकडाऊनचे आदेश जिल्हा प्रशासनाने शनिवारीच दिले आहेत. या गावांत ये-जा करण्यास बंदी आहे. व्यापार व वाहतुकीवर निर्बंध आहेत. अशा गावांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. आदेशाची अंमलबजावणी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समितीने सुरू केली आहे. आदेशाचा भंग केल्यास पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

मिरजेतील व्यापारी बंडाच्या पवित्र्यात; आज दुकाने उघडणार
मिरज : पुढारी वृत्तसेवा
मिरजेतील व्यापार्‍यांनी अखेर निर्बंध झुगारून सोमवार (दि.19) पासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे शासनाने जे नियम घालून दिले आहेत, ते पाळून मिरज शहरातील दुकाने सोमवारी उघडण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. ‘मी मिरजकर फाऊंडेंशन’च्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने उघडणार असल्याने मिरजेतीलही दुकाने उघडण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यासाठी ‘मी मिरजकर फाऊंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. रविवारी अनेक व्यापार्‍यांसमवेत बैठक झाली. यावेळी व्यापारी व पदाधिकार्‍यांनी बाजू मांडली. एकीकडे कोल्हापुरातही कोरोना असताना तेथील दुकाने उघडू शकतात, तर मग सांगली जिल्ह्यातील दुकाने का उघडता येणार नाहीत, असा प्रश्न अनेकांनीविचारला. दुकाने बंद असल्याने मोठे नुकसान होत असल्याच्या मुद्यावरही र्चा करण्यात आली. अखेरीस सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाचे नियमही पाळण्यात येणार आहेत. दुकाने उघडल्यानंतर जर शासकीय अधिकार्‍यांनी कारवाई केली तर त्याला एकत्रीत पणे विरोध केला जाईल आणि दंडही आम्ही भरू असा निर्णय झाला असल्याचे फौंडेशनचे निमंत्रक सुधाकर खाडे यांनी सांगितले.

यावेळी व्यापारी वासूदेव मेघाणी, गजेंद्र कुल्लोळी, नगरसेवक यागेंद्र थोरात, मराठा समाजाचे नेते विलास देसाई, अतिष अग्रवाल, शितल पाटोळे, महेश चौगुले, प्रशांत पवार, सोनू चढ्ढा, सुरेश आहुजा यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Back to top button