एकीसोबत प्रेमाच्या आणाभाका अन् दुसरीशी विवाह करणाऱ्या प्रियकराला मंडपातून उचललं - पुढारी

एकीसोबत प्रेमाच्या आणाभाका अन् दुसरीशी विवाह करणाऱ्या प्रियकराला मंडपातून उचललं

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीला प्रेमाच्या आणाभाका देत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या कथित प्रियकराचा बुरखा कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी फाडला. प्रेयसीला धोका देऊन तिच्याऐवजी अन्य तरूणीशी लगीनगाठ बांधण्याच्या तयारीत असतानाच या कथित प्रियकराला पोलिसांनी मंडपातून ताब्यात घेतले.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात असलेल्या शिवाजी कॉलनी परिसरात अजय उर्फ विक्की फ्रान्सिस हा कुटुंबासह राहतो. कल्याण रेल्वे यार्डमध्ये नोकरी करणाऱ्या विक्कीचे काही महिन्यांपासून कल्याण पूर्वेत राहणाऱ्या मॅरेज इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबध निर्माण झाले. त्यांनतर प्रेमाच्या आणाभाका देत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत या महाशयांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे प्रेयसी गरोदर राहिली. ही बाब कळताच पुन्हा लग्नाचे अमिष दाखवून भूलथापा देत तिचा गर्भपातही केला.

अजयने उर्फ विक्की याने आपल्या प्रेयसीला दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार असल्याची माहिती लपवून ठेवली होती. त्यातच अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात 29 डिसेंबर रोजी अजयचा विवाह होणार असल्याची माहिती प्रेयसीला मिळाली. तिने तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत अजयच्या विरोधात तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून वपोनि बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विवाहसोहळा असलेल्या बडनेऱ्यात कोळसेवाडी पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यावेळी बोहल्यावर चढण्याआधीच पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अजय याला ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक इर्शाद सय्यद करत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button