Dhule Crime : धुळ्यात ४२ लाखांचा गुटखा जप्त; दोघे ताब्यात | पुढारी

Dhule Crime : धुळ्यात ४२ लाखांचा गुटखा जप्त; दोघे ताब्यात

धुळे, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावरून जळगाव शहराकडे होणारी गुटख्याची तस्करी (Dhule Crime) धुळ्याच्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील पथकांनी हाणून पाडली आहे. या पथकाने महामार्गावर पाठलाग करून पकडलेल्या ट्रकमधून सुमारे 42 लाखांचा गुटखा जप्त केला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी आज दिली.

धुळे शहरातून गुटख्याची मोठी तस्करी (Dhule Crime) होणार असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर एका पथकाला सापळा लावण्याचे आदेश केले. यावेळी मालेगाव शहराकडून (एमएच 15 जी व्ही 97 41) ट्रक संशयितपणे महामार्गावरून जात असल्याने पथकाने या ट्रकचा चालकाला गाडी थांबवण्यासाठी इशारा केला. पोलीस पथक पाहताच चालकाने महामार्गावरून ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न सुरू केला. पथकाने ट्रकचा पाठलाग केला.

हा ट्रक हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ पथकाने अडवला. ट्रकमध्ये असलेले शेख हारून शेख हुसेन आणि मोहम्मद समिल मोहम्मद सलीम या दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस पथकाने ट्रकची ताडपत्री उघडून पाहिले असता त्यात खाकी रंगाचे कार्टून व पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये गुटखा आणि पान मसाला असल्याचे निदर्शनास आले. या दोघांसह ट्रक पोलीस ठाण्यात आणून ही माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला कळवली.

ट्रकमधून 17 खोक्यांमधून सुमारे 36 लाख 27 हजार 800 रुपये किमतीच्या पान मसाला आणि एकोणावीस पांढऱ्या गोण्यामधून सहा लाख 27 हजार रुपये किमतीच्या प्रतिबंधित तंबाखूची पाकीटे ताब्यात घेण्यात आली. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोघा संशयित आरोपींच्या विरोधात भादवि कलम 328 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी माहिती देताना सांगितले की, “राज्य शासनाने महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेल्या कोणत्याही प्रकारचा गुटखा आणि तंबाखू विक्री करण्यावर प्रतिबंध असून असा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे गुटखा पाठवणारा व्यापारी आणि खरेदी करणाऱ्या व्यापारीपर्यंत हे गुन्हे दाखल केले जाणार आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचलं का?

Back to top button