दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून द्या | पुढारी

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून द्या

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे मोठी हानी झाली आहे. आता भाजपने मन मोठे दाखवून ही जागा बिनविरोध करत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. काँग्रेस कमिटीत आयोजित शोकसभेत ते बोलत होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोल्हापूरसाठी खूप मोठे योगदान दिले. उद्योगाबरोबर चंद्रकांत जाधव यांचे खेळामध्ये ही खूप मोठे योगदान होते. पोटनिवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे; परंतु जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सावरायचे असेल आणि जाधव यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट द्यावे. त्यांच्याविरोधात कुणीही उमेदवार देऊ नये. भाजपने मनाचा मोठेपणा दाखवावा.’

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘आमदार चंद्रकांत जाधव हॉस्पिटलमध्ये असतानाही लोकांच्या कामासंदर्भातील फोन सुरूच होते. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे व्हिजन मोठे होते. प्रत्येक गोष्टीत बारकावा होता, जिल्ह्याचा आणि शहराचा विकास करण्याची तळमळ असणारे ते जिद्दी व्यक्तिमत्व होते. लोकांसाठी तळमळ असणारा, जिद्दी आणि लढाऊबाणा असणारा दिलदार माणूस आपल्यातून निघून गेला, ही भावना मन अस्वस्थ करणारी आहे.’

काँग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव  (वय 57) यांचे हैदराबाद येथे उपचार सुरु असताना गुरुवारी पहाटे निधन झाले. पोटावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती; पण अचानक तब्येत बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचलं का? 

Back to top button