आडमुठ्या चीनचा पाकिस्तानला ठेंगा! | पुढारी

आडमुठ्या चीनचा पाकिस्तानला ठेंगा!

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : चीनच्या आडमुठ्या धोरणाचा फटका खुद्द त्यांचा जवळचा मित्र देश असलेल्या पाकिस्तानलाच बसला आहे. चीनच्या विविध विद्यापीठांत आणि कॉलेजमध्ये शिकणार्‍या सुमारे 11 हजार पाकिस्तानी विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये येण्यास सरकारने मज्जाव केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

चीनमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर जानेवारी 2020 मध्ये 11 हजार पाकिस्तानी विद्यार्थी मायदेशी परतले. त्यांना 7 महिन्यानंतर जुलै 2020 मध्ये चीनमध्ये परतायचे होते. आता 2021 साल संपत आले तरीही चीनने या विद्यार्थ्यांना परत येण्यास मनाई केली जात आहे.
या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चिनी दूतावासाकडे आपल्या व्यथा मांडली. मात्र चिनी दूतावासाने या विद्यार्थ्यांची दखलही घेतली नाही आणि त्यांच्या ई-मेल्सचे उत्तरही दिले नाही.

दुसरीकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या विद्यार्थ्यांची सोशल मीडिया अकाऊंटस्ही ब्लॉक करून टाकली आहेत. चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याचे चीनने फर्मान काढले. चीनच्या विविध कॉलेजमध्ये शिकणार्‍या 11 हजार मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांना परत येण्यास चीनने नकार दिला आहे. निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी इम्रान खान सरकारमधील मंत्री, परराष्ट्र मंत्रालय आणि चीन दूतावासाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यांना हताशपणे माघारी परतावे लागले.

केवळ पाकिस्तानचा विश्वासघात

चीनने केवळ पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनाच अशी वागणूक दिली आहे. पाकिस्तान सोडून अन्य देशांतील विद्यार्थ्यांना परतण्यास चीनने मंजुरी दिली आहे. मात्र पाकिस्तानबरोबरच चीन आडमुठे धोरण का घेत आहे, हे समजण्यापलीकडचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पाकिस्तानी विद्यार्थ्यांचे चीनमध्ये कोरोना लसीकरण झाले आहे, आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत. तरीही या विद्यार्थ्यांना चीन सरकारने व्हिसा देण्यास नकार दिला आहे.

Back to top button