Mamata Banerjee Mumbai : ममता दीदींच्या मुंबई भेटीचे काय परिणाम? - पुढारी

Mamata Banerjee Mumbai : ममता दीदींच्या मुंबई भेटीचे काय परिणाम?

पुढारी ऑनलाईन 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee mumbai ) यांनी नुकताच मुंबईचा दौरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट नियोजित होती मात्र, ती होऊ शकली नाही. मात्र, शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली. अन्य काही भेटीगाठी घेतल्या. या भेटीगाठीतून त्यांनी काँग्रेसला इशारा तर भाजपला आव्हान दिले आहे, असे मानले जाते. मात्र, नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे? या भेटीतून काय साध्य होणार, याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांच्याशी केलेली बातचीत…

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याने फार मोठे परिणाम होणार नाहीत. ते न होण्याचे कारण असे की, भाजप प्रचंड गतीने वाढत आहे. त्यांचे छोटे छोटे इव्हेंट मोठे आहेत. परवा नाशिकला त्यांनी बुद्धविहारांचा कार्यक्रम घेतला, त्यांनंतर भिक्कूंना भाजपने पार्टी प्रचाराला लावले. याला राजकीय भाषेत ‘कल्चररल रिव्ह्युलेशन’ असे म्हटले जाते. चंद्रगुप्ताचे राज्य येण्याआधी बुद्धाची क्रांती झाली. १९४७ काँग्रेस सत्तेत आली तेव्हा भारतीय स्वातंत्र्याची क्रांती झाली होती, असे डाॅ. प्रकाश पवार यांनी सांगितले.

आता ममता बॅनर्जी मुंबईत येऊन काही राजकीय नेत्यांना भेटल्या. यातून त्या कुठली क्रांती निर्माण करत आहेत, असा प्रश्न जर विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. काही ठराविक बातम्या आणि चर्चा यापलिकडे या भेटीला महत्त्व नाही. व्यक्तींना भेटणे आणि डावपेच आखणे यात फरक असतो. हे डावपेचाचे राजकारण आहे.

सध्या राजकारणाचा कर्ता घटक शेतकरी, मजूर, मध्यम शेतकरी जाती नाहीत तर तो आहे मध्यमवर्ग. ममता बॅनर्जी यांच्या भेटीगाठीतील भाषा मध्यमवर्गाच्या विषयांना हात घालणारी, आकार देणारी आहे का? हेही तपासले पाहिजे. उदाहरणादाखल पहायला गेले तर भारतीय मध्यमवर्गीय लोकांच्या मनात आरक्षणाबाबत एक मत आहे. हे आरक्षण त्यांना नको आहे. त्या भावनेबाबत काही त्या काही बोलतात का? त्याबद्दल काही तोडगा काही सुचवतात का? आरक्षण आहे तर ते का आहे? आणि नको आहे तर ते का नको आहे यावर ते काहीच बोलत नाहीत, असेही ते म्‍हणाले.

mamata banerjee mumbai : मध्यवर्गाच्या मनाला स्पर्श करेल अशी भाषा नाही

दुसरा मुद्दा आहे तो कराचा. मध्यमवर्ग असे मानतो की, हा देश आपल्या करातून चालतो. मात्र, ममता बॅनर्जी किंवा भाजपविरोधात फ्रंट तयार करणारे कुणीच या कररुपाने जमा झालेल्या पैशाच्या उधळपट्टीबाबत बोलत नाही. सरकार नेमके पैसे कशावर खर्च करते. भाजपने कशाकशावर पैसे खर्च केलेत आणि हा पैसा कसा वाया गेला हे ते सांगत नाहीत. मध्यमवर्गाला असे वाटत राहते की,   ंबीजेपी इज ऑलवेज राइट’   हे लोक केवळ कटकारस्थान करून भाजपला पाडू पाहत आहेत. याचाच अर्थ कर्ता घटक असलेल्या मध्यवर्गाच्या मनाला स्पर्श करेल, अशी त्यांची भाषा नाही. तो कळीचा मुद्दा हे हाताळू शकत नाहीत. त्यामुळे हा घटक विरोधी पक्षांकडे आकर्षित होणार नाही, असेही डाॅ. पवार यांनी सांगितले.

mamata banerjee mumbai : चार दिवस चर्चा होते; पण याचे मतात रुपांतर होत नाही

मुंबई हे आर्थिक शहर आहे. आर्थिक घडामोडीत मुंबईची कशी अधोगती होत आहे, किंवा आर्थिक राजधानी म्हणून ते कसे दुर्लक्षित होत आहे, मोठी कार्यालये कशी हलवली जात आहेत याबाबत ममता बॅनर्जी एक शब्दही बोलल्या नाहीत. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे अस्मिता जागृत केली. तशी त्यांनी महाराष्ट्रात करून पाहिले आहे. म्हणजे मराठीतून भाषण करणे, अस्मितेचा मुद्दा बोलणे. परंतु ही तात्पुरती गोष्ट झाली. याची एखादी बातमी होते किंवा चार दिवस चर्चा होते पण याचे मतात रुपांतर होत नाही, असे निरीक्षणही डाॅ. प्रकाश पवार यांनी नाेंदवले.

सत्तांतर ही गोष्ट प्रशांत किशोर यांच्या आवाक्यातील नाही

भाजप सत्तेत येणे ही गोष्ट सोपी नव्हती आणि त्यांना खाली खेचनेही सोपे नाही. या सगळ्या घडामोठीमागे प्रशांत किशोर यांचा हात असेल असे वाटत नाही. कारण त्यांचा कार्यभाग केवळ कमर्शियल आहे. त्यांना कंत्राट मिळणार का नाही, एवढ्याशी त्यांचा संबंध आहे. ते भारतीय मध्यमवर्गाचे मत बदलू शकत नाहीत.

२०१४ मध्ये भाजपचे काम केले मात्र, खरे पहायला गेले तर भारतीय मध्यमवर्ग त्यावेळी भाजपकडे आला होता. म्हणून त्यांना श्रेय घेता आले. पश्चिम बंगालमध्ये मध्यमवर्ग हा कम्युनिस्‍ट पक्षांकडून  ममता बॅनर्जींकडे आला होता. त्याला फक्त ‘जैसे थे’ थांबवणे हेच काम होते ते त्यांनी केले आहे. किशोर यांनी फार काही क्रांती तेथे केली नाही. संपूर्ण मध्यमवर्ग ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आहे आणि तो त्यांनी वळवून आणला आहे, असे झालेले नाही. एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे मतदार आणला असे घडलेले नाही. त्यामुळे सत्तांतर ही गोष्ट प्रशांत किशोर यांच्या आवाक्यातील नाही.ते प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेससारख्या पक्षाला फसवत आहेत. चांगला वक्ता जसे काम करतो तसे ते सर्व्हे करतात, ते अगदी चांगल्या पद्धतीने मांडण्याचे काम ते करतात, असेही ते म्‍हणाले.

उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये प्रशांत किशाेर यांनी  जर काँग्रेसला विजय मिळवून दिला असता त्‍यांच्‍या राजकारण करण्याची हिंमत आहे, हे सर्वांनी मान्य केले असते; पण जेथे आधीच ताकद तयार झाली आहे तिला केवळ ते चुचकारून दाखवतात.  भाजपच्या विजयाचे श्रेय एकट्या प्रशांत किशोर यांना द्यायचे ठरले तर राष्टीय स्वयंसेवक संघाची एवढी मोठी संघटना, त्यांचे सेवाभावी कार्यकर्ते यांचे काय करायचे असा मोठा प्रश्न आहे. ममता बॅनर्जी यांच्याबाबतही तसेच म्हणावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्‍ट पक्षाशी कधी काळी इतका संघर्ष केला आहे की, तो त्यांचा अनुभव आणि मध्यमवर्गाला दाखवलेले स्वप्‍न हे महत्त्वाचे आहे. ते स्वप्न पूर्ण भंग पावले होते असे नाही. भाजपला त्या स्वप्नाच्या जवळ जाणे अवघड होते. किशोर यांनी भाजपचे कंत्राट घेऊन जर भाजपला जिंकून दाखवले असते तर त्यांची ताकद मान्य केली असती, असेही निरीक्षणही त्‍यांनी नाेंदवले.

mamata banerjee mumbai : ममता बॅनर्जी यांची मुंबई भेट केवळ चर्चा घडवून आणणारी

कालची ममता बॅनर्जी यांची भेट mamata banerjee mumbai ही वरवरची वाटते. मीडियामध्‍ये स्वत:च्या चर्चा घडवून आणणे यापलिकडे ही भेट नव्हती. भारतीय राजकारणाला टर्निंग पॉइंट देणारी वैगेरे काही नव्हती. काँग्रेसला सोडून आपण नेतृत्व करायचे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा असू शकते. मुळात राहुल गांधी यांचा भाजपसारख्या महाकाय पक्षासमोर त्यांचा टिकाव लागत नाहीत. राहुल गांधी फिल्डवर येऊन लढले तरी कुणी विचारणार नाहीत, अशी परिस्थिती नाही. अशा काळात राहुल गांधींनी पुढे येऊन लढावे, अशी अपेक्षा म्हणजे कुडाला मेढीचा आधार अशी अवस्था आहे. जर भाजपविरोधात आघाडीच उघडायची तर भारतातील जे जे विरोधक आहेत. त्या त्या सर्वांना एकत्र करून त्यांच्यासाठी आपण कुठलाही त्याग करायला तयार आहोत असे त्या म्हणत नाहीत. माझे राजकारण नष्ट झाले तरी चालेल पण मी भाजपला संपवणार, असे त्या म्हणू शकतील का? हा मोठा प्रश्न आहे. गोव्यासारख्या लहानशा राज्यात माझी ताकद नाही, पण काँग्रेसची आहे. त्यामुळे मी काँग्रेससाठी १० दिवस तळ ठोकून बसणार आणि काँग्रेसला मदत करणार असे त्या म्हणत नाहीत. ममता बॅनर्जी यांची राजकीय महात्त्वाकांक्षा एवढीच आहे की, राष्ट्रवादी काँग्रेससारखा हा त्‍यांना तृणमूल काँग्रेसही राष्ट्रीय पक्ष करायचा आहे. ही महत्त्वाकांक्षा सत्तांतर करण्याची नाही. फार फार तर केंद्रात काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेणे. त्यादृष्टीनेच ममता बॅनर्जी यांची वाटचाल सुरू आहे, असेही डाॅ. पवार म्‍हणाले.

mamta banerjee mumbai : विरोधकांची फाटाफूट हेच भाजपच्या पथ्यावर

तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर भाजपची जागतिक पातळीवर नाचक्की झाली. भाजप काहीतरी चुकीचे करत आहे, असा  संदेश गेला. हे भाजपविरोधी वातावरण विरोधकांनी वापरायला हवे होते. मात्र, शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे योगेंद्र यादव वेगळेच बोलतात, राकेश टिकैत यांची भाषा दुसरीच आहे. शेतकऱ्यांना प्रचंड मदत करणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष काढला आहे. यांच्यात एकमत नाही. मोदी जाळ्यात अडकले पण हे जाळे इतके फाटके आहे की, ते सहज त्यातून सुटले आहेत. कृषी कायद्यावरून मोदींना आपण कचाट्यात पकडू शकतो हे विरोधकांच्या लक्षातही आलेले नाही, इतके राजकीय अज्ञान त्यांच्याकडे आहे. शरद पवार यांचे वय पाहता देशात पर्याय द्यावा इतकी ते ताकद उभी करू शकतील, अशी शक्यता नाही. शिवाय त्यांनी याआधी असे कुठलेही प्रयत्न केले नाहीत. त्यांनी आपली बार्गेनिंग पॉवर वाढविली. त्यातून जेवढे पदरात पडेल ते घेतले. संपूर्ण सत्तांतर ही कल्पना शरद पवार यांनी वर्कआऊट केलीय असे कधी झालेले नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना कितपत ताकद पुरवतील याबाबत शंका आहे. सत्तांतरासाठी पूर्ण वेगळा विचार करणारा माणूस हवा. सध्या तरी ते दृष्टिक्षेपात नाही, असेही डाॅ. प्रकाश पवार यांनी स्‍पष्‍ट केले.

  • शब्दांकन : बाळासाहेब पाटील

हेही वाचलं का? 

Back to top button