गोवा : भाजपच्या मंत्र्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार | पुढारी

गोवा : भाजपच्या मंत्र्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचा आरोप मंगळवारी काँग्रेसने केला आणि राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र, संबंधित मंत्र्याचे नाव उघड करण्यास काँग्रेसने नकार दिला. त्या मंत्र्याने एका महिलेला फसवून तिच्यावर बळजबरी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांना हे प्रकरण माहीत आहे. त्या मंत्र्याला 15 दिवसांत मंत्रिमंडळातून वगळावे, न पेक्षा त्या मंत्र्याचे नाव जाहीर करू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक, प्रदेश सचिव रॉयला फर्नांडिस व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

चोडणकर म्हणाले की, आपणास एका व्यक्तीने दाखवलेल्या व्हिडीओ क्लिपनुसार हा मंत्री त्या महिलेवर बळजबरी तथा लैंगिक अत्याचार करीत असावा, असे स्पष्ट होते. तसेच तिला कुणाला या प्रकाराबद्दल न बोलण्याची धमकी तो मंत्री देत आहे. त्याशिवाय त्या महिलेला गर्भपात करण्याच्याही सूचना तो करीत असल्याचे या क्लिपमधून दिसते. आपणास ही क्लिप्स पाहून त्या मंत्र्याचा संताप आल्यामुळेच आम्ही पत्रकार परिषद घेतल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

महिला अत्याचाराचे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेे होेते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांचा वापर केला, असा दावा करून दोषी मंत्र्याला मंत्रिमंडळातून न काढता प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस निषेध करत असल्याचे चोडणकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी येत्या पंधरा दिवसांत त्या मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडावे, न पेक्षा काँग्रेस त्या मंत्र्याचे नाव जाहीर करेल, असा इशारा देऊन त्या महिलेला पोलिसात तक्रार करण्यास काँग्रेस सांगणार नाही, असे चोडणकर यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

गोव्याचे नेतृत्व कमजोर असल्याने राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. वर्षभरात 60 बलात्काराची प्रकरणे नोंद झाली आहेत. महिलांवरील अत्याचाराचा राष्ट्रीय स्तरावर 4.3 टक्के दर आहे. गोव्यात तो दुप्पट 7.8 आहे. यावरून गोव्यात महिला सुरक्षित नसल्याचे सिद्ध होत असल्याचे चोडणकर म्हणाले.

‘त्या’ मंत्र्याकडे तडजोडीचे काँग्रेसचे प्रयत्न?

काही महिन्यांपूर्वीचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी काँग्रेसला व्हिडिओ क्लीप प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचे काही पदाधिकारी त्या मंत्र्याकडे गेले होते. त्याच्याकडे तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न फसल्याची चर्चा पत्रकार परिषदेत होती. त्यावर चोडणकर यांना विचारले असता, आपणास याबाबत काही माहिती नसल्याचे ते म्हणाले.

मंत्रिमंडळातून पंधरा दिवसांत काढून टाका

पंधरा दिवसांत संबंधित मंत्र्याला मंत्रिमंडळातून न काढल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा यावेळी बीना नाईक यांनी दिला. त्या मंत्र्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्याची मागणी रॉयला फर्नांडिस यांनी केली.

विरोधक करीत असलेले आरोप हे नैराश्यातून आहेत. भाजप सरकारने राज्यात केेलेल्या विकासकामांमुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते बेछूट आरोप करत आहेत. कोणी कितीही आरोप केले तरी पुढील सरकार हे भाजपचेच असणार आहे.

– डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

काँग्रेस पक्षाचे गोवा अध्यक्ष गिरीश चोडणकर हे नेहमीच हवेत गोळीबार करतात. पुरावे नसताना आरोप करणेे, ही त्यांची सवय आहे. मंत्र्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करताना त्या मंत्र्याचे नाव न सांगणे हा तोच प्रकार. काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येऊ नयेत, म्हणून चोडणकरांचे प्रयत्न असावेत.

– सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मंत्र्यावर काँग्रेसने केलेलेे आरोप खरे ठरल्यास येत्या काळात गोव्यासह ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत तेथे भाजपला नुकसान होऊ शकते. आपणाला मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे आरोप खरे असावेत.

– कार्लुस आल्मेदा,
आमदार, भाजप

Back to top button