वेगळे विदर्भ राज्य? लोकसभेत मोदी सरकारच्या मंत्र्याने दिले ‘हे’ उत्तर | पुढारी

वेगळे विदर्भ राज्य? लोकसभेत मोदी सरकारच्या मंत्र्याने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

वेगळे विदर्भ राज्याची मागणी अधून मधून होते, त्यासाठी आंदोलने होतात. मात्र, पुढे काहीच होत नाही. मात्र, हा प्रश्न लोकसभेत चर्चेला आला आणि मोदी सरकारला उत्तर द्यावे लागले. वेगळ्या विदर्भाबाबत मोदी सरकार आणि राज्यातील भाजपची काय भूमिका आहे, याबाबत प्रस्ताव आला आणि सरकारने असा वेगळ्या विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे उत्तर दिले.

स्वतंत्र विदर्भ राज्य बनविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे का किंवा असा प्रस्ताव विचाराधीन आहे का? असेल तर सरकारने काय कार्यवाही केली आहे, असा प्रश्न विचारला होता. याला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राय म्हणाले, ‘वेगळा विदर्भ व्हावा, अशी मागणी अधून मधून होत असते. कधी वैयक्तिक पातळीवर तर कधी विविध संघटना अशा मागण्या करत असतात. मात्र, वेगळ्या विदर्भ राज्याबाबत असा कोणताही प्रस्ताव वा मागणी आमच्याकडे आलेली नाही. नवीन राज्याची निर्माण करण्यासाठी मोठी आणि व्यापक प्रक्रिया असते. आपल्या देशाच्या संघराज्य पद्धतीशी ही प्रक्रिया निगडीत आहे. अशावेळी नवीन राज्याच्या निर्मितीबाबतचा निर्णय हा केवळ आणि केवळ सर्व संबंधित घटकांचा विचार करूनच घेतला जात असतो. त्यासाठी व्यापक सहमती लागते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button