पक्षाच्या लेखी विद्यमान खासदारांपैकी डेंजर झोनमध्ये समाविष्ट असूनही, भाजपने धुळ्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या गळ्यात तिसर्यांदा उमेदवारीची माळ टाकली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत मतदारसंघ वाट्याला आलेला काँग्रेस हा उमेदवाराच्या शोधात असताना, दुसरीकडे डॉ. भामरे यांचे डोळे 'एमआयएम' उमेदवाराकडे लागून राहिले आहेत. कारण दोन लाखांहून अधिक मुस्लिम मतांचेे ध्रुवीकरण 'एमआयएम'च्या माध्यमातून झाल्यास मतविभागणी होऊन त्यावर डॉ. भामरेंच्या सलग तिसर्या विजयाचा गुलाल उधळणे अवलंबून राहणार आहे.
2014 आणि 2019 अशा दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांत सफाईदार विजय मिळवणार्या डॉ. भामरे यांना यंदा विजयाच्या हॅट्ट्रिकची संधी आहे. वस्तुत: त्यांना पक्ष तिकीट देतो की नाही, अशी चर्चा होती. तथापि, सलग तिसर्यांदा ते श्रेष्ठींची पसंती ठरले. धुळे शहर आणि ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य आणि बाह्य तसेच बागलाण या विधानसभा क्षेत्रांना कवेत घेणार्या धुळे मतदार संघात संमिश्र मतदार आढळून येतो. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याची असली, तरी सलग तीन निवडणुकांतील पराभवाने पक्षनेतृत्व खचल्याचे सांगण्यात येते. परिणामी, या पक्षाकडून उमेदवारी घेण्यास फार कोणी उत्सुक नसल्याचीही चर्चा आहे. पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावांची चर्चा उमेदवारीसाठी आहे. दोन-तीन दिवसांत नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
धुळे मतदार संघातील लक्षणीय बाब म्हणजे त्यामध्ये दोन ठिकाणी 'एमआयएम' आमदार आहेत. धुळे शहर आणि मालेगाव मध्य मतदार संघांमधील या आमदारांना प्राप्त एकूण मतांची संख्या पावणेदोन लाखांच्या घरात आहे. याचा अर्थ यंदा लोकसभेसाठी या दोन्ही मतदार संघांतील मुस्लिम मतदारांची संख्या दोन लाखांवर असल्याचे मानले जात आहे. वंचित बहुजन आघाडीने निवृत्त अधिकारी अब्दुल रेहमान यांना याच अनुषंगाने मैदानात उतरवले आहे. मात्र, येथील मुस्लिम मतदारांवरील 'एमआयएम'चा पगडा दुर्लक्षून चालणार नाही. पक्षाच्या पारड्यात पडण्याची सूतराम शक्यता नसलेल्या या मतांचा जोगवा प्रमुख विरोधक काँग्रेसला लाभदायी ठरणार नाही, असे भाजपचे गणित आहे. एकूणच मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण 'एमआयएम'च्या बाजूने होणे भाजपहिताचे असल्यानेच डॉ. भामरे मनोमन 'एमआयएम' उमेदवाराच्या घोषणेकडे लक्ष ठेवून असल्याचे म्हटल्यास नवल नाही. कारण मुस्लिम मतांचेे ध्रुवीकरण 'एमआयएम'च्या माध्यमातून होण्यावर डॉ. भामरेंच्या सलग तिसर्या विजयाचा गुलाल उधळणे अवलंबून राहणार आहे.
मालेगाव आणि धुळे शहरांतील मुस्लिम मतदारांनी दशकानुदशके काँग्रेस पक्षाची पाठराखण केली. किंबहुना, काँग्रेस या समाजाकडे व्होट बँक म्हणूनच बघत आला. गेल्या काही वर्षांत मात्र समीकरणे बदलली. काँग्रेसने आपला केवळ राजकीय वापर करून घेतल्याची भावना झालेल्या मुस्लिम मतदारांचा कल ओवैसी बंधूंच्या 'एमआयएम' पक्षाकडे वाढला. याच अनुषंगाने निर्णायक मतदान असलेल्या उपरोक्त दोन्ही विधासभा मतदार संघांत 'एमआयएम' उमेदवार निवडून आले. काँग्रेसपेक्षा 'एमआयएम' केव्हाही बरा, या मुद्द्यावर हा वर्ग यंदाही ठाम राहणार असल्याने धुळे मतदारसंघातील विजयाची दोरी त्याच्या हाती राहणार, हे निश्चित.