Lok Sabha Election : सर्वाधिक वेळा विजयी झालेले नेते

Lok Sabha Election
Lok Sabha Election
Published on
Updated on

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, सर्वाधिक काळ खासदार म्हणून काम केलेल्या नेत्यांमध्ये दिग्गज मंडळींचा समावेश आहे. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजित गुप्ता यांचे नाव अग्रस्थानी आहे. याखेरीज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हेही तब्बल दहा वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. ( Lok Sabha Election )

संबंधित बातम्या 

इंद्रजित गुप्ता : सर्वाधिक काळ खासदार म्हणून काम पाहिलेल्या काही मोजक्या नेत्यांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते इंद्रजित गुप्ता पहिल्या क्रमांकावर गणले जातात. त्यांनी तब्बल अकरा वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. 1960 ते 2001 या कालावधीत त्यांनी कोलकाता दक्षिण, अलिपूर बशीरहट आणि मिदनापूर या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. एच. डी. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे केंद्रात एवढे तगडे मंत्रिपद असूनही दिल्लीत ते छोट्या सदनिकेत राहणे पसंत करत असत.

अटल बिहारी वाजपेयी : भारतीय राजकारणातील सौजन्यमूर्ती अशी ओळख असलेले दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दहा वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. सुरुवातीला भारतीय जनसंघ, नंतर जनता पक्ष आणि त्यानंतर भाजपच्या तिकिटावर त्यांनी निवडणुका लढविल्या. बलरामपूर, ग्वाल्हेर आणि त्यानंतर 1991 ते 2009 या कालावधीत लागोपाठ पाच वेळा वाजपेयी यांनी लखनौ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

सोमनाथ चॅटर्जी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांनी वाजपेयी यांच्याप्रमाणेच दहा वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत लोकसभेचे चौदावे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.

पी. एम. सईद : लक्षद्वीप मतदारसंघातून 1967 ते 2004 या कालावधीत लागोपाठ दहा वेळा विजय मिळवून काँग्रेसचे उमेदवार पी. एम. सईद यांनी इतिहास रचला. 1967 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून सईद यांनी तेथे एकहाती वर्चस्व गाजविले. केंद्रात त्यांनी ऊर्जामंत्री म्हणूनही काम पाहिले.

कमलनाथ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून नऊ वेळा विजय मिळवला. याचबरोबर त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपदही भूषविले.

जॉर्ज फर्नांडिस : पत्रकार, मुत्सद्दी, धडाडीचे कामगार नेते आणि समता पक्षाचे संस्थापक अशी ओळख असलेले जॉर्ज फर्नांडिस हेही नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. दक्षिण मुंबईतून 1967 साली त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला. नंतर त्यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर आणि नालंदा मतदारसंघांचे प्रतिनिधित्वही केले. केंद्रात त्यांनी संरक्षण, रेल्वे आणि उद्योग खात्यांचे मंत्रिपद सांभाळले.

गिरीधर गमांग : ओडिशाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या गिरीधर गमांग यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तब्बल नऊ वेळा कोरपट मतदारसंघातून विजय मिळवला. राजकारणाच्या धबडग्यातून ते वेळ मिळेल तेव्हा अप्रतिम ढोलकी वाजवत असत. तो त्यांचा आवडता छंद होता.

खरगपती प्रधानी : ओडिशातील नवरंगपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून खरगपती प्रधानी यांनी नऊ वेळा निवडणूक जिंकली होती. आम जनतेचे प्रश्न लोकसभेत तळमळीने मांडण्यात त्यांचा हातखंडा होता.

माधवराव शिंदे : ग्वाल्हेरचे महाराजा म्हणजेच माधवराव शिंदे यांनी नऊ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. ग्वाल्हेर हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ. याखेरीज त्यांनी केंद्रात रेल्वे, पर्यटन, मनुष्यबळ विकास आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयही सांभाळले.

रामविलास पासवान : बिहारमधील जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांची जडणघडण जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 1977 साली त्यांनी हाजिपूर मतदारसंघातून एकूण मतांच्या 89.30 टक्के मते मिळवून विश्वविक्रम केला होता. लोकसभेवर ते आठ वेळा निवडून गेले. विशेष म्हणजे पाच पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम केले.

बी. शंकरानंद : कर्नाटकातील चिकोडी राखीव मतदारसंघातून बी. शंकरानंद यांनी आठ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. विशेष म्हणजे यातील सात वेळा त्यांनी सलग विजय मिळवला. याखेरीज ते केंद्रात विविध खात्यांचे मंत्री होते. गाजलेल्या बोफोर्स भ्रष्टाचारप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे ते प्रमुख होते. या समितीने 26 एप्रिल 1988 रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. ( Lok Sabha Election )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news