कोल्हापूर : हनी ट्रॅप मध्ये स्वतःच्या पत्नीचा वापर करून व्यावसायिकाला लुटलं | पुढारी

कोल्हापूर : हनी ट्रॅप मध्ये स्वतःच्या पत्नीचा वापर करून व्यावसायिकाला लुटलं

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

हनी ट्रॅप मध्ये स्वतःच्या पत्नीचा वापर करून कोल्हापूर येथील सराईत टोळीने एका बड्या व्यावसायिकाला लाखो रुपयाला लुबाडल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या पतीसह सहा जणांविरुद्ध कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित महिलेसह सर्व सराईत पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके मार्गस्त झाले आहेत.

हनी ट्रीप संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले ही चौथी घटना आहे. डिसेंबर 2020 पासून फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये कागल येथील राज डिलक्स लॉजिंग अँड बोर्डिंग तसेच कागल येथील सर्विस रोड याशिवाय निशा चौकाजवळ रोडवर ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हनी ट्रॅप प्रकरणी मुख्य संशयित महिला प्रिया, रोहित, प्रियाचा पती व त्याच्या समवेत दोन अनोळखी इसम आणि विजय कलकुटगी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयिताने येथील लिशा चौकाजवळ व्यापाऱ्याकडून उकळले आहेत. यापैकी विजय कलकुटगी हा सराईत गुन्हेगार असून हनी ट्रॅप प्रकरणी त्याच्यावर कोल्हापुरात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिस सूत्रांकडून माहीत झाले की तक्रारदार व्यवसायिक आणि संबंधित महिलेची तिच्या पतीमार्फत ओळख झाली. मोबाइल चॅटिंगद्वारे सलगी वाढत वाढत गेली. पतीसह साथीदाराने पत्नीला पुढे करून संबंधित व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर उचगाव तालुका करवीर कागल येथील लॉज तसेच सर्विस रोड आणि कोल्हापूर येथे बोलावून मोबाईलवर चित्रीकरण केले. या आधारे व्यावसायिकास बदनामीकारक चित्रफित व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच वेळोवेळी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.

आजअखेर एक लाखाचे रक्कम टोळीने उकळली आहे, असे व्यावसायिकाने कागल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हनी ट्रॅप मध्ये फसगत झालेल्या व्यापारी व्यवसायिक आणि कॉलेज तरुणांनी थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार संबंधित व्यावसायिकाने कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शक्ती मिल बलात्कार प्रकरण : 7 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

 

Back to top button