सातारा : जेव्हा अशोक कामटेच अशोक कामटेंना भेटतात..! | पुढारी

सातारा : जेव्हा अशोक कामटेच अशोक कामटेंना भेटतात..!

सातारा; पुढारी वृत्तसेवा

26/11 च्या हल्ल्याला आज (शुक्रवारी) तेरा वर्षे पूर्ण होत आहेत. सातारा पोलिस दलाचे एकेकाळी पोलिस अधीक्षकपद भुषवलेल्या व या हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे यांच्याबाबत सेवानिवृत्त झालेले व नामसाधर्म्य असलेले सातारचे पोलिस उपनिरीक्षक अशोक दत्तात्रय कामटे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

सातारचे अशोक दत्तात्रय कामटे सध्या सदरबझार येथे वास्तव्य करत आहेत. त्यांचे सध्या 69 वय असून ते 1971 साली सातारा पोलिस दलात भरती झाले होते.

सुमारे 28 वर्षापूर्वी कराड शहरात एक दंगल झाल्याने कराड पोलिस ठाण्याला भेट देण्यासाठी त्यावेळी तत्कालीन पोलिस अधीक्षक शहीद अशोक कामटे गेले होते. त्यावेळी कराड शहर पोलीस ठाण्यात सर्व माहिती घेत असताना पोलिसांशी संवाद साधत होते. पोलिसांशी चर्चा सुरु असताना एसपी अशोक कामटे यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तेथेच पोलीस मोटार परिवहन विभागामध्ये (एमटी) काम करत असणारे एका पोलिसाचे नाव देखील अशोक कामटेच होते!

1993 साली त्यांची सातारा येथून कराड येथे बदली झाली. त्याचवर्षी एसपी अशोक कामटे यांची गडचिरोली येथून सातारला बदली झाली होती. भारदास्त, डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे एसपी अशोक कामटे यांनी अवघ्या काही दिवसातच सातारा जिल्ह्यावर आपली छाप पाडली होती. त्याचवर्षी कराड शहरात एक दंगल झाली. सुदैवाने पोलिसांनी तात्काळ उपाययोजना राबवल्याने ती सर्व परिस्थिती आटोक्यात आली. या गंभीर घटनेमुळे एसपी अशोक कामटे यांनी कराड पोलिस ठाण्याला भेट दिली.

कराड पोलिसांशी संवाद साधत असतानाच पोलीस मोटर परिवहन विभागाची माहिती घेत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत असणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक देवआनंद यादव यांनी ‘पोलीस कॉन्स्टेबल अशोक कामटे’ यांना हाक मारली. अशोक कामटे नाव ऐकताच शेजारी उभे असणारे ‘एसपी अशोक कामटे’ गडबडून गेले व ते म्हणाले ‘मै तो यहीं खडा हू.’ त्यावेळी यादव यांनी सातारा पोलिस दलातील कॉन्स्टेबलचे नाव देखील अशोक कामटे आहे असे सांगितले. एसपी अशोक कामटे या सर्व प्रकारामुळे आश्चर्यचकित झाले.

एकदा सातारला कामानिमित्त कॉन्स्टेबल अशोक कामटे आले होते.एसपी अशोक कामटे यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि अन्य अधिकार्‍यांना ते म्हणाले, ‘कराड के एसपी आये है’ यावर उपस्थित अधिकारी, सर्व कर्मचार्‍यांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण झाला. पुढे एसपी यांच्या वाहनावर त्यावेळेस मापारी व गायकवाड हे चालक म्हणून काम करत होते. मात्र ते दोघेही ज्यावेळेस नसतील त्या वेळेस कॉन्स्टेबल अशोक कामटे हे एसपी अशोक कामटे यांचे सारथ्य करत होते. अशाप्रकारे सातारच्या अशोक कामटे यांनी अनेक किस्से सांगताना हुंदका आवरला नाही व ते गहिवरले.

सस्पेंड पोलिस.. दिलदार खेळाडू..

सातार्‍यात असताना पोलिस परेड ग्राऊंडवर एसपी अशोक कामटे हे सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत बॅडमिंटन खेळत असत. त्यावेळी त्यांच्यासोबत एक पोलिस कॉन्स्टेबल खेळत असे. त्या पोलिसाचा खेळ दर्जेदार असल्याने दोघांची चांगलीच जुगलबंदी व्हायची. एकदा मात्र सलग तीन-चार दिवस तो कॉन्स्टेबल पोलीस खेळायला आला नाही. यामुळे एसपींनी चौकशी केली असता उपस्थित अधिकार्‍यांनी सांगितले की ‘साहेब तुम्हीच त्यांना निलंबित केले आहे.’ कामटे यांनी तात्काळ माहिती घेवून दुसर्‍या दिवशी त्याची फाईल मागवून घेतली. निलंबितचे कारण गंभीर नसल्याने त्या पोलिसाला बोलावून घेत पुन्हा चूक न करण्यास बजावले. ‘दुसर्‍या दिवसापासून जॉईन हो व बॅडमिंटन खेळायला ये’ असा आदेेेश देताच त्या पोलिसाने कामटे यांना खणखणीत सॅल्युट ठोकला होता, याची आठवणही कॉन्स्टेबल कामटे यांनी करुन दिली.

एसपी कामटे व सातारचे कामटे गाववाले..

दोन्ही कामटे एकमेकांना भेटल्यानंतर एसपी अशोक कामटे यांनी कॉन्स्टेबल कामटे यांना ‘आपका पूरा नाम क्या है? आप कहा के रहनेवाले हो,’ असे विचारले. कॉन्स्टेबल कामटे यांनी त्यांचे मूळ गाव चांभळी ता. पुरंदर, जि. पुणे आहे, असे सांगितले. त्यावर एसपी कामटेदेखील म्हणाले ‘मेरा गाँव भी वही है’ त्या गावात कामटे आडनावाची लोक भरपूर असल्याचे चर्चेतून समोर आले. दरम्यान, आपल्याच नावाचा पोलिस भेटल्याच्या आनंदाने एसपी कामटे यांनी कॉन्स्टेबल कामटे यांना शेकहँन्ड केले होते, हे सांगतानाही कॉ. कामटे भावूक झाले होते.

हेही वाचलत का?

Back to top button